परवाना नसणाऱ्या नौकांना ३१ हजाराचा दंड, मासळी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:39 AM2020-09-30T11:39:35+5:302020-09-30T11:40:41+5:30
परवाना नसताना मासेमारी करणाऱ्या तीन पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाकडून मिरकरवाडा येथे कारवाई केली़ या कारवाईमध्ये ३१ हजार रुपयांचा ठोठावण्यात येऊन नौकेवरील सर्व मासळी जप्त करण्यात आली़.
रत्नागिरी : परवाना नसताना मासेमारी करणाऱ्या तीन पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाकडून मिरकरवाडा येथे कारवाई केली़ या कारवाईमध्ये ३१ हजार रुपयांचा ठोठावण्यात येऊन नौकेवरील सर्व मासळी जप्त करण्यात आली़.
ही कारवाई मत्स्य विभागाच्या परवाना अधिकारी डॉ़ रश्मी नाईक-आंबुलकर यांनी सागरी सुरक्षा रक्षक तुषार कनगुटकर, सुरक्षा रक्षक आकाश श्रीनाथ, आणि शहर पोलिसांना बरोबर घेऊन मिरकरवाडा बंदरात केली़ इम्तीयाज, अल् जैनुद्दीन व युसुफी अशी कारवाई करण्यात आलेल्या पर्ससीन नौकांची नांवे आहेत़ या नौकांवरील बांगडा, ढोमी, खवळा आणि कोळंबी ही मासळी जप्त करण्यात आली़.
यावेळी इम्तीयाज ही मिनी पर्ससीन नौकेने मिरकरवाडा बंदरात या मत्स्य विभागाच्या पथकाला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता़ मात्र, मत्स्य परवाना अधिकारी नाईक-आंबुलकर यांच्या पथकाने या नौकेला पळून जात असताना पकडले़ त्यानंतर या नौकेच्या मालकाकडून २० हजार ९०० रुपये इतका दंड वसूल केला़ व अन्य दोन नौकांकडून १० हजार १०० रुपये असा एकूण ३१ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला़.
मासेमारी हंगाम सुरु असून पर्ससीन नेटने मासेमारी करण्यात येत आहे़ मासेमारी करण्यासाठी अवश्यक असणारा परवाना नसतानासुध्दा काही पर्ससीन नेट नौका मासेमारी करीत आहेत़ अशा पध्दतीने मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकांवर कारवाई करण्यात आली आहे़ त्यामुळे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांना आळा बसणार आहे़