रत्नागिरी जिल्ह्यात वळीव पावसाची हजेरी, आंबा बागायतदार चिंतेत
By अरुण आडिवरेकर | Published: May 9, 2023 11:43 AM2023-05-09T11:43:56+5:302023-05-09T11:44:19+5:30
पावसामुळे काही भागातील वीजपुरवठही खंडीत
रत्नागिरी : जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळनंतर जिल्ह्यातील काही भागात वळीव पावसाने हजेरी लावली. आज पहाटेपासून रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या परिसरात वळीव पावसाने हजेरी लावली.
काल चिपळुणातील पूर्व भागात पावसाने हजेरी लावली होती. तर रात्री राजापूर तालुक्यातही पाऊस पडला. पावसामुळे काही भागातील वीजपुरवठही खंडीत झाला होता. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.
आज सकाळी रत्नागिरी शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली होती. अचानक आलेल्या पावसामुळे सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. अचानक पडलेल्या पावसामुळे मुळात अडचणीत आलेल्या आंबा व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मंगळवारी काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सध्या पावसाच्या आधी मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तसेच नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे. त्यावरही वळीव पावसामुळे अडचणी येत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अंदमानसह बंगालच्या उपसागरातील बेटांवर जोरदार पाऊस सुरू झाला. दक्षिण किनारपट्ट्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.