बेवारस मृतदेहामुळे मंदिरांतील चोऱ्या उघड-

By admin | Published: August 31, 2014 10:30 PM2014-08-31T22:30:47+5:302014-08-31T23:35:09+5:30

लाखो रुपयांचा ऐवज जप्त: मुख्य सूत्रधाराचा मृत्यू, सर्व शिलेदार मात्र पोलिसांच्या जाळ्यात

The untimely burglars reveal the burglars in the temple- | बेवारस मृतदेहामुळे मंदिरांतील चोऱ्या उघड-

बेवारस मृतदेहामुळे मंदिरांतील चोऱ्या उघड-

Next

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह नजीकच्या आणखी काही जिल्ह्यांमध्ये २०१० साली चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. या काळात मंदिरे फोडणे, आतील देवतांचे दागिने लंपास करणे, घरफोड्या करणे, जबरी चोऱ्या करणे, यासारख्या प्रकारांनी नागरिक धास्तावून गेले तर पोलिसांपुढे या चोरट्यांनी फार मोठे आव्हान उभे केले. काही केल्या चोरट्यांचा थांग लागत नव्हता. अचानकपणे संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरवली येथे सापडलेल्या बेवारस मृतदेहाच्या तपासावरुन या सर्व मंदिर चोऱ्यांचे गूढ अखेर उलगडले आणि तब्बल १९ गुन्ह्यांमागील चोरट्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले.
१८ फेब्रुवारी २०१० रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरवली येथे एक बेवारस मृतदेह आढळून आला. संगमेश्वर पोलीस या बेवारस मृतदेहाबाबत तपास करीत असतानाच मृताची पत्नी व इतर नातेवाईकांकडूनही त्याचा शोध घेतला जात होता. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि या संशयावरुनच मेंदूू ऊर्फ महेंद्र कुमारसिंग रजपूत, चेतन गोपाळ उगरेज या दोन व्यक्तींना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता मृत व्यक्ती ही दिनेश जयंती बुटीया (रा. कन्नमवारनगर, नं. २, विक्रोळी) येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी तत्काळ संगमेश्वर व माखजन येथे जाऊन चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या व्यक्ती आणि त्यांच्याकडे असलेल्या क्वॉलिस गाडीची झडती घेतली. त्यात अनेक संशयास्पद वस्तू आढळून आल्या. शिवाय दोघांनीही दिलेली विसंगत उत्तरे पाहता पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हा अन्वेषणचे एक पथक मुंबईत पाठविण्यात आले. विक्रोळी पोलिसांना कळवून नाकेबंदी करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांनी विक्रोळी पोलिसांच्या मदतीने प्रभू संतोष खेडेकर, किरीट जयंती बुटिया, जयंत रामचंद्र आयरे, अशोक शंकर किनाळे, पर्बत गोपाळ उगरेज यांना अटक केली. त्यानंतर मृत असलेला दिनेश बुटिया हाच मंदीर चोऱ्यांमधील प्रमुख सूत्रधार असल्याचे पोलिसांना आढळून आले आणि इथूनच काही महिने सुरु असलेल्या मंदीर चोऱ्यांमागील गुपीत उघड झाले. सुरुवातीला या प्रकरणात पोलिसांनी आठजणांना अटक करुन रत्नागिरीत आणले. त्यांच्याकडील स्कॉर्पिओ गाडीही जप्त केली. दिनेश बुटिया याने आपल्या नेतृत्त्वाखालील टोळीच्या सहाय्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यामधील अनेक मंदिरे फोडली.
घरफोड्या केल्या, अशी कबुली या चोरट्यांकडून देण्यात आली. राजापूरमधील धूतपापेश्वर, विजयदुर्गमधील रामेश्वर मंदीर, देवरुखचे मार्लेश्वर ही प्रमुख मंदिरे फोडण्याचे सर्व गुन्हे दिनेश बुटिया आणि त्याच्या टोळीने केले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील सहा चोऱ्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जबरी चोरी, आठ चोऱ्या, सातारा जिल्ह्यातील वाई - पाचगणी येथील दोन घरफोड्यांची कबुली अटक केलेल्या गुन्हेगारांनी दिली. यातील सातारा जिल्ह्यातील गुन्हेवगळता इतर सर्व गुन्ह्यातील माल पोलिसांनी जप्त केला. या आरोपींकडून सोने, चांदी, पितळ, लाकडी सोंगे, सुरपेटी, सारीपाट सोंगट्या, टाळ, नगारा इत्यादी १४ लाख ४३ हजार ४ रुपयांचा ऐवज, तर १५ लाख रुपये किमतीच्या तीन गाड्या असा ऐवज पोलिसांनी जप्त केला. सोने, चांदी, पितळ हे धातू वितळविलेल्या स्थितीत आढळले.
या दिनेश बुटिया टोळीने २०१०मध्ये काही महिने मंदिर विश्वस्त संस्थांची झोप उडविली होती. अखेर या टोळीतीलच मुख्य सूत्रधाराचा संगमेश्वर - आरवलीमध्ये बुडून मृत्यू झाल्यानंतर व त्याच्या बेवारस मृतदेहाची चौकशी सुरु असताना त्यातून या असंख्य चोऱ्यांप्रकरणी धागेदोरे हाती लागले. त्यामुळेच मंदिर चोऱ्यांमागील गूढ उकलण्यात मदत झाली. पोलिसांकडे न येता त्यांचे नातेवाईक परस्पर मृतदेहाचा शोध घेऊ लागले त्यावेळीच पोलिसांच्या मनातील शंका आणि संशय बळावला की, यामागे काहीतरी वेगळे प्रकरण आहे आणि त्या उत्सुकतेमुळेच पुढील तपासाला गती मिळाली. प्रथम दोघेजण ताब्यात आले आणि एक-एक करत अनेक गुन्ह्यांचे स्वरुप उघड झाले. या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यानंतर आता हे प्रकरण न्यायालयाच्या कक्षेत आहे.
- प्रकाश वराडकर

एक मंदिर फोडताना दुसऱ्याची रेकी
दिनेश बुटिया सूत्रधार असलेल्या या टोळीची मंदिर फोडी करण्याची वेगळीच पद्धत होती, असे तपासात निष्पन्न झाले. टोळीतील चेतन या आरोपीचा पूर्वी मसाल्याचा व कपड्यांचा व्यापार होता. जोडधंदा म्हणून तो जुनी लाकडे, सोंगे विकत घेऊन मुंबई, नाशिक, अहमदाबाद, दिल्ली येथील व्यापाऱ्यांना विकायचा. त्यामुळे तो या जिल्ह्यांमध्ये वावरलेला होता व शुद्ध मराठी बोलायचा. रस्ते आणि गावांचीही चांगली ओळख त्याला होती. तो एखादे मंदिर हेरुन दिनेश बुटियाला माहिती द्यायचा. त्यानंतर दिनेश आपल्या मित्रांसमवेत भाड्याने गाडी घेऊन टेहळणी करुन जात असे. जाता-जाता पूर्वी टेहळणी केलेल्या मंदिरामध्ये चोरी करुन मुंबईला जात असे. त्या दिवशी टेहळणी केलेल्या मंदिरामध्ये पुढे कधी चोरी करायची याचे नियोजन करीत असे. चोरीसाठी मुंबईहून ही टोळी सायंकाळी निघून रात्री मंदिराजवळ पोहोचत असत. मध्यरात्री चोरी करुन सकाळी मुंबईकडे परत जात असे. चोरीचा माल खपवण्यासाठी पत्नी सुनीता, किरीट व पपेश यांची मदत घेत असे.

पेहराव पर्यटकाचा
दिनेश बुटिया याने गिर्ये रामेश्वर मंदिर फोडीनंतर स्वत: क्वॉलिस गाडी खरेदी केली होती. या गाडीमधून प्रवास करताना कोणालाही संशय येऊ नये म्हणून पर्यटक असल्याचा पेहराव केला जायचा. शिवाय कॅमेरा, देवदेवतांच्या भजनांच्या कॅसेटस्, टोप्या, नकाशे इत्यादी साहित्य गाडीत ठेवले जायचे. त्यामुळे पोलिसांनाही त्याच्याबाबत संशय घेणे कठीण जायचे.

Web Title: The untimely burglars reveal the burglars in the temple-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.