सावरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 05:52 PM2019-10-14T17:52:30+5:302019-10-14T17:55:47+5:30
चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आलेल्या विज्ञाननिष्ठ वीरपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचा अनावरण सोहोळा रविवारी सायंकाळी पतित पावन मंदिराचे विश्वस्त उन्मेष शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आलेल्या विज्ञाननिष्ठ वीरपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचा अनावरण सोहोळा रविवारी सायंकाळी पतित पावन मंदिराचे विश्वस्त उन्मेष शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
धामणी-संगमेश्वरचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे व्यासंगी अभ्यासक श्रीनिवास पेंडसे यांच्या समाजसुधारक सावरकर या विषयावरील व्याख्यानाने उपस्थितांची कोजागिरी पौर्णिमेची सायंकाळ संस्मरणीय झाली.
या कार्यक्रमाला सावरकरांचा सहवास लाभलेल्या कुटुंबियांच्या सदस्यांचा सहभाग होता. वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले यांनी परिघाबाहेरचे कार्यक्रम कोणी करत नाही म्हणून आपण करायचे अशा शब्दात त्यांनी वाचनालयाच्या विविधांगी कार्यक्रमांमागील भूमिका मांडली.
वाचनालयाने सावरकरांच्या माझे मृत्यूपत्र कवितेतील,
की घेतले न हे व्रत अंधतेने ।
लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने ।
जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे ।
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ।
या पंक्तींचे शब्दशिल्प बनवून ते वाचनालयाच्या प्रवेद्वारापाशी लावले आहे. चिपळूणच्या जुन्या पद्मा थिएटर परिसरातील सावरकरांचे भाषण, सभा, स्वागत आणि सत्कार याची आठवणही इंगवले यांनी सांगितली.
ज्यांच्या हस्ते काव्यशब्दशिल्पचे अनावरण झाले त्या उन्मेश शिंदे यांचे आजोबा हिंदू महासभेचे अध्यक्ष आणि भागोजीशेठ कीर यांचे वर्गमित्र होते. त्यांनी तत्कालिन आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश बेहेरे यांनी सन १९५६ साली सावरकर आपल्या घरी आल्याची आठवण सांगताना तेव्हाचा फोटोही जपून ठेवल्याचे सांगितले.
श्रीनिवास पेंडसे समाजसुधारक सावरकर या विषयावर बोलताना म्हणाले की, इतिहासात अनेक घटना घडतात. मात्र, इतिहासासकडे दुर्लक्ष केल्याने भविष्य अंधारमय होतं. त्यांनी सावरकरांच्या ह्यसहा सोनेरी पानेह्णचा दाखला यावेळी दिला. भेदनीती, वर्णव्यवस्था यामुळे भारत अनेकदा पारतंत्र्यात गेला. सन १९०२ साली वयाच्या १९ व्या वर्षी सावरकरांनी बालविधवा दु:स्थितीकथन कविता लिहिली. सन १९२४ नंतर ते समाजसुधारणेकडे वळले असले तरी त्यांचा लढा तत्पूर्वीपासूनच सुरु होता, असे सांगितले.