रामदास कदम यांच्या भूमिकेनंतर खेडमध्ये उद्या तातडीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 07:10 PM2022-07-22T19:10:49+5:302022-07-22T19:11:17+5:30
गेल्या अडीच वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर राहिलेले रामदास कदम यांची दुसरी राजकीय इनिंग सुरू होणार का, याची उत्सुकता
खेड : शिवसेना नेते रामदास कदम यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षांतर्गत हालचाली वाढल्या आहेत. रामदास कदम यांच्या भूमिकेमुळे खेड तालुक्यात उलथापालथ हाेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुका पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक लावण्यात आली आहे.
खेडमध्ये तालुका शिवसेनेची बैठक उद्या, शनिवारी (दि. २३) जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी भरणे येथील हॉटेल बीसूमध्ये दुपारी १२.३० वाजता आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना दिले आहे.
रामदास कदम यांची पक्षाने हकालपट्टी केल्याचे पडसाद खेड तालुक्यात उमटणार आहेत. हकालपट्टीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नेतेपदी निवड केली. आगामी कालावधीत रामदास कदम कोकणात जोरदार शक्तिप्रदर्शन करतील, असे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे कदम यांना रोखण्यासाठी काही जुने शिवसैनिक व्यूहरचना आखत आहेत.
रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना आगामी कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शिवसैनिकांना संबोधित करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कोकणातील शिवसेनेत हालचालींना वेग आला असून, रामदास कदम राज्य दौऱ्याची सुरुवात कोकणातून करण्याची शक्यता आहे. रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत दापोली विधानसभा मतदारसंघात थेट जनतेशी संवाद साधला हाेता.
रामदास कदम यांनी राजीनामा देताच एक जुना शिवसैनिकांचा गट त्यांना रोखण्यासाठी पुढे येत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर राहिलेले रामदास कदम यांची दुसरी राजकीय इनिंग सुरू होणार का, याची उत्सुकता सर्वांना आहे.