पोलिसांकडून ई-चलन प्रणालीचा वापर- : ‘त्या’ वाहनचालकांना भरावा लागणार तत्काळ दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:59 AM2019-04-03T11:59:15+5:302019-04-03T12:01:01+5:30
नियमांचा भंग करून निघून जाणाºया वाहन चालकांना आता नियमभंग केल्याचा दंड जागीच भरावा लागणार आहे. वाहतूक नियमांचा भंग करणाºयांवर कारवाईसाठी एक राज्य, एक चलन या संकल्पनेचा अवलंब
रत्नागिरी : नियमांचा भंग करून निघून जाणाºया वाहन चालकांना आता नियमभंग केल्याचा दंड जागीच भरावा लागणार आहे. वाहतूक नियमांचा भंग करणाºयांवर कारवाईसाठी एक राज्य, एक चलन या संकल्पनेचा अवलंब रत्नागिरीत १ एप्रिल २०१९पासून मारूती मंदिर येथून सुरू करण्यात आला आहे. नियम मोडणाºया वाहनचालकांना दंड करण्यात आला. पोलिसांच्या या पेपरलेस प्रणालीचीच चर्चा रत्नागिरीत सुरू आहे.
ई-चलन योजनेच्या आरंभप्रसंगी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते उपस्थित होते. या योजनेअंतर्गत रत्नागिरी पोलिसांना एकूण ५० डिव्हाईस मिळाली आहेत. त्यामध्ये बिलिंग मशीन व स्वाईप मशीन यांचा समावेश आहे. या मशीनचा वापर कसा करावा, याचे दोन दिवसांचे प्रशिक्षणही ४० पोेलीस कर्मचाºयांना देण्यात आले आहे. त्यानंतर आता या चलन मशीनचा वापर सुरू करण्यात आला आहे. याआधी पोलीस नियम मोडणाºया वाहनांवर कारवाईसाठी हातात पुस्तके घेऊन असायचे. आता त्यांच्या हाती ई-चलन मशीन आल्या आहेत. या नवीन प्रणालीमुळे नियम मोडून वाहने चालविणाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या ई-चलन मशीनमुळे कोणत्याही वाहन चालकाने राज्यात कोठेही नियमभंग केल्याने त्याला दंड झालेला असेल, दंड भरलेला नसेल, त्याला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने कितीवेळा दंड भरावा लागला, याची माहिती एका क्लीकवर या मशीनवर मिळणार आहे.
बॉडीवॉर्न कॅमेरा वापर
ई-चलन प्रणालीआधी रत्नागिरीच्या वाहतूक पोलिसांना बॉडीवॉर्न कॅमेरही देण्यात आले आहेत. कोणी वाहनचालक उध्दट वर्तन करीत असेल त्याचे रेकॉर्डिंग या बॉडीवॉर्न कॅमेºयावर होणार आहे. तसेच पोलिसांवरही वरिष्ठांची या निमित्ताने नजर राहणार आहे.