यांत्रिक अवजारांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:21 AM2021-06-20T04:21:41+5:302021-06-20T04:21:41+5:30
नांगरासाठी लागणाऱ्या बैलजोडीसाठी किमान ४० ते ५० हजार रुपये मोजावे लागत आहेत. नांगरणीनंतर बैलांच्या देखभालीसाठी, खाद्यासाठी हजारो रुपये खर्च ...
नांगरासाठी लागणाऱ्या बैलजोडीसाठी किमान ४० ते ५० हजार रुपये मोजावे लागत आहेत. नांगरणीनंतर बैलांच्या देखभालीसाठी, खाद्यासाठी हजारो रुपये खर्च करावा लागत असल्याने यांत्रिक अवजारे वापरण्याकडे कल वाढला आहे. जिल्ह्यात भातानंतर भाजीपाला किंवा एखादे पीक घेण्यात येते. बारमाही शेती नसल्यामुळे बैलजोडी सांभाळणे खर्चिक बनले आहे. त्यामुळे भाड्याने नांगर घेणे परवडत आहे. नांगराला दिवसाला ५०० ते ६०० रुपये भाडे आकारले जात असले तरी पॉवर टिलरचे तासाला ४०० ते ५०० रुपये भाडे देणे परवडत आहे.
पॉवर टिलरमुळे नांगरणी कमी वेळेत व चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा पॉवर टिलर वापरण्याकडे कल वाढला आहे. शिवाय खर्चही व वेळही वाचत आहे. काही शेतकरी स्वत:च्या शेतीनंतर पॉवर टिलर भाड्याने देत असल्यामुळे अर्थार्जनाचा मार्गही मोकळा झाला आहे.
ग्रास कटरला मागणी
जिल्हा फलोत्पादन घोषित करण्यात आल्यानंतर फळबाग लागवडीकडे कल वाढला आहे. मृग नक्षत्रात लागवड करण्यात येते. पावसाळ्यात फळबागांमध्ये गवत मोठ्या प्रमाणावर वाढते. बागेतील गवत काढणे अनिवार्य असून, साफ-सफाई करण्यासाठी मजुरांवर प्रचंड खर्च करावा लागतो. ग्रास कटरद्वारे गवत कापण्याचे काम मात्र सोपे झाले आहे. यंत्रामुळे मनुष्यबळाचा वापर कमी झाला आहे. शिवाय शासनाकडून अनुदान उपलब्ध होत असल्याने ग्रास कटरसाठी शेतकऱ्यांची मागणी वाढत आहे. तणनाशक व कीटकनाशक फवारणी गटर पंप, स्प्रे पंपामुळे सहज शक्य होत आहे. पॉवर टिलर, भात झोडणी, भात लागवड यंत्रामुळे कामांचा उरक वेळेवर होत आहे. शिवाय यांत्रिक अवजारांसाठी अनुदानही उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांचा कल यांत्रिक अवजारांकडे वाढत असून, महाडीबीटी पोर्टलवर त्यासाठी मागणी अर्ज करण्यात येत आहेत.