नवीन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:32 AM2021-04-22T04:32:57+5:302021-04-22T04:32:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणच्या लाल मातीत बारमाही शेतीतून चांगल्या दर्जाचे उत्पन्न वेतोशी येथील परेश चंद्रकांत भावे मिळवत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोकणच्या लाल मातीत बारमाही शेतीतून चांगल्या दर्जाचे उत्पन्न वेतोशी येथील परेश चंद्रकांत भावे मिळवत आहेत. आंबा, काजू पिकांशिवाय भात, भुईमूग, सूर्यफूल तसेच विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेत आहेत. शेतातील पालापाचोळा एकत्र करून त्यापासून गांडूळखत युनिट तसेच गुरांच्या शेणापासून गोबरगॅस युनिट उभारले आहे. शेणापासून कंपोस्ट खत तयार करीत असून ९० टक्के सेंद्रिय उत्पादने घेत आहेत. रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर मात्र गरजेपुरताच करीत आहेत.
परेश भावे कृषी पदवीधारक आहेत. शेतीची आवड असल्याने पदवीनंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळले. वडिलोपार्जित शेती करतानाच त्यांनी शेतीचा विस्तार वाढविला आहे. चाळीस एकर क्षेत्रावर त्यांनी आंबा कलमांची लागवड केली आहे. सेंद्रिय पद्धतीने आंब्याचे उत्पादन घेत असल्याने दर्जा चांगला आहे. वाशी, पुणे मार्केटसह खासगी विक्रीवर त्यांचा विशेष भर आहे. काजू बागेत ८०० ते ९०० झाडांची लागवड असून, वर्षाला अडीच ते तीन टन काजू त्यांना प्राप्त होतात. गावठी काजूसह विद्यापीठ प्रमाणित वेंगुर्ला ४, ५ वाणांची लागवड केली आहे. ओल्या काजूपेक्षा वाळलेला काजूची विक्री करणे परवडते.
पारंपरिक पद्धतीने भात लागवड करण्याऐवजी भात, तसेच भाजीपाला शेतीत नवनवीन तंत्रज्ञान व प्रयोग सतत करीत असतात. कृषी संशोधन केंद्र शिरगावने संशोधित केलेल्या वाणाची लागवड ते करीत आहेत. पेरणीपासून कापणीपर्यंत योग्य काळजी घेण्यात येत असल्यामुळे त्यांच्याकडील भाताचा दर्जा उत्तम आहे. भात काढल्यानंतर काही क्षेत्रावर सूर्यफूल, भूईमूग, कलिंगड, वांगी, मिरची, कुळीथ तसेच पालेभाज्यांमध्ये मुळा, माठ, मोहरीची लागवड करीत आहेत. योग्य नियोजन करून प्रत्येक पिकासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली वाणांची निवड करून लागवड करीत आहेत. सध्या शेतीसाठी मनुष्यबळ फारसे लाभत नाही. त्यामुळे यांत्रिक अवजारांचा वापर ते अधिक करीत आहेत. बागायती असो वा शेतीतील गवत काढण्यासाठी ग्रास कटरचा वापर त्यांना फायदेशीर ठरत आहे. पॉवर टिलरमुळे नांगरणी तर पॉवर स्प्रेअरमुळे फवारणीचे काम सोपे झाले आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी म्हशी व गायींचा सांभाळ केला आहे. शेणापासून कंपोस्ट, जीवामृत तयार करतात. दुभत्या जनावरांसाठी ओल्या चाऱ्याची उपलब्धता व्हावी, यासाठी मका, ज्वारीची लागवड केली आहे.
शंभर नारळ, ३०० सुपारी लागवड असून नारळीबागेत त्यांनी मसाला लागवड करून लाखीबाग तयार केली आहे. त्यापासूनही चांगले उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे. बागेतच त्यांनी कंपोस्ट व गांडूळ खत युनिट तयार केले आहे. स्वत: खत तयार करीत असून स्वत:च्या शेतीसाठी त्याचा वापर करून नंतर उर्वरित खताची विक्री ते करीत आहेत. नियोजन असेल तर प्रत्येक गोष्टीतून फायदा होतो. शेतीमध्ये कष्ट प्रचंड आहेत. मात्र, मेहनतीचे फळ मिळतेच अशी त्यांची धारणा आहे. कातळावरील बागायतीसाठी बारमाही पाण्याकरिता शेततळे बांधले असून, पावसाचे वाया जाणारे पाणी साचत असल्याने त्याचा त्यांना फायदा होत आहे.
शेततळ्याचा फायदा
भावे यांनी कातळ जमिनीमध्ये शेततळे उभारले आहे. २०११ साली बांधण्यात आलेल्या शेततळ्यातील पाणी मे महिन्यापर्यंत पुरते. त्यामुळे बारमाही शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. कोकणच्या लाल मातीमध्ये विविध प्रकारची पिके घेतात येतात, किंबहुना चांगल्या दर्जाचे उत्पन्न घेता येते, हे भावे यांनी सिद्ध केले असून, त्यासाठी आई-वडील, पत्नीचे सहकार्य लाभत आहे.