बारसूमध्ये आक्रमक आंदोलकांना थोपवण्यासाठी अश्रूधुराचा वापर
By मनोज मुळ्ये | Published: April 28, 2023 04:42 PM2023-04-28T16:42:56+5:302023-04-28T16:43:11+5:30
आंदोलकांमध्ये खळबळ उडाली आहे.
राजापूर : दोन दिवस शांततामय मार्गाने रिफायनरीविरोधी आंदोलन करणाऱ्या बारसू ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांच्या दौऱ्यानंतर शुक्रवारी आक्रमक रुप धारण केले आहे. शुक्रवारी दुपारी प्रतिबंधित सर्वेक्षण क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न लोकांनी केल्याने पोलिसांनी त्यांना थोपवण्यासाठी अश्रुधुराची नळकांडी फोडली आहेत. त्याने आंदोलकांमध्ये खळबळ उडाली आहे.
रिफायनरी प्रकल्पासाठी सुरू असलेले भू सर्वेक्षण थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. आम्हाला प्रकल्पच नको, अशी भूमिका घेणाऱ्या या ग्रामस्थांचे आंदोलन शांततामय मार्गाने सुरू होते. बुधवारी खासदार विनायक राऊत यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी मोर्चा काढण्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.
शुक्रवारी मोर्चा काढण्याच्या तयारीने खासदार राऊत बारसूकडे जाण्यासाठी निघाले. रानतळे येथे त्यांना अडवून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दोन तासातच ग्रामस्थांनी सर्वेक्षणासाठी प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना थोपवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. त्यामुळे काहीजणांचे डोळे चुरचुरले, श्वास घेताना त्रास होऊ लागला. त्यामुळे आंदोवाक ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली.