श्रीगणेशासमोर नतमस्तक होऊन ‘उस्तादां’नी जिंकले रत्नागिरीकरांचे मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:26 IST2024-12-17T15:25:25+5:302024-12-17T15:26:17+5:30
रत्नागिरी : रंगमंचावर पाऊल ठेवताच श्रीगणेशासमाेर नतमस्तक हाेत उस्ताद झाकीर हुसेन यांनी रत्नागिरीकरांची मने जिंकली हाेती. त्यानंतर तबल्यावर जादुईने ...

श्रीगणेशासमोर नतमस्तक होऊन ‘उस्तादां’नी जिंकले रत्नागिरीकरांचे मन
रत्नागिरी : रंगमंचावर पाऊल ठेवताच श्रीगणेशासमाेर नतमस्तक हाेत उस्ताद झाकीर हुसेन यांनी रत्नागिरीकरांची मने जिंकली हाेती. त्यानंतर तबल्यावर जादुईने थिरकणारी बाेट, तबला वादनातून निघणारे वेगवेगळे आवाज यातून ‘उस्तादां’नी रत्नागिरीकरांना आपलेसे केले. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या जाण्याने तब्बल सात वर्षांनंतरही रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमाची आठवण रत्नागिरीकरांच्या स्मरणात आहे.
रत्नागिरीतील थिबा पॅलेस येथील प्रांगणात आर्ट सर्कलतर्फे कला-संगीत महोत्सवाचा दशकपूर्ती सोहळा दि. ९ फेब्रुवारी २०१७ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला सोलो वादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. रत्नागिरीत कार्यक्रमानिमित्त आलेल्या झाकीर हुसेन या पाहण्यासाठी आणि त्यांच्या तबला वादनाचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली हाेती.
उस्ताद झाकीर हुसेन स्वत: दोन हातात तबला घेऊन रंगमंचावर आले आणि रंगमंचावर पाऊल ठेवताच समोरील श्रीगणेश मूर्तीसमोर नतमस्तक झाले, त्यांचा कलेप्रती असलेला आदर रत्नागिरीकरांना भावला आणि रत्नागिरीकरांनी त्यांच्या या कृतीचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्याचवेळी त्यांच्या स्वागतासाठी ढोलवादन करण्यात आले. मराठमाेळ्या ढाेलवादनाचे आणि ढाेलवादकांचे उस्ताद झाकीर हुसेन यांनी काैतुकही केले.
रत्नागिरीकरांना मोहीत केले..
तालाचे विविध प्रकार, तबल्यातून निघणारे नाद, त्याचबराेबर पावसाचे थेंब, वेगवेगळ्या छतावर पडणाऱ्या पावसाचा आवाज, विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, कडाडणारी तोफ, महादेवाचा डमरू, शंखध्वनी, सुपरफास्ट रेल्वेचा आवाज तबल्याच्या माध्यमातून उस्ताद झाकीर हुसेन यांनी सादर करून रत्नागिरीकरांची मने जिंकली हाेती.