रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:50+5:302021-07-08T04:21:50+5:30
रत्नागिरी : कोकण विभागात, विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे प्राधान्याने भरावीत, असे ...
रत्नागिरी : कोकण विभागात, विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे प्राधान्याने भरावीत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेतील उपमुख्यकार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त व लेखा अधिकारी व अन्य महत्त्वाची पदे बऱ्याच कालावधीपासून रिक्त असल्याची माहिती पुढे आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी सर्वच विभागांना त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. राज्य शासनाचे साधारणपणे ३ टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. ४-५ वर्षांपासून राज्यातील भरती प्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून, शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, सर्वच विभागांमधील क्षेत्रीय स्तरावरील महत्त्वाची कार्यकारी पदे तातडीने भरण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी रिक्तपदांची माहिती संकलित करण्यास सांगितले.
कोकणात विभागात, विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करण्यास उत्सुक नसल्याने बहुतांश अधिकारी येथून बदली करून घेतात. त्यामुळे कोकणातील अनेक पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात काम करण्यास उत्सुक असलेल्या अधिकाऱ्यांची पसंती घेऊन त्यांची प्राधान्याने नियुक्त करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी, एमपीएससी सदस्याच्या सर्व जागा ३१ जुलै, २०२१ अखेरपर्यंत भरण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केली आहे.