Corona vaccine-जिल्ह्यात पाच केंद्रांवर ५०० जणांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:49 PM2021-01-16T12:49:18+5:302021-01-16T12:51:14+5:30
Corona vaccine Ratnagiri -कोविशिल्ड या कोरोनावरील लसीचा प्रारंभ सकाळी ८ वाजता जिल्ह्यात शनिवारी करण्यात आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील दोन उपजिल्हा रुग्णालये आणि दोन ग्रामीण रुग्णालये इथल्या प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा मुले-गावडे यांनी दिली.
रत्नागिरी : कोविशिल्ड या कोरोनावरील लसीचा प्रारंभ सकाळी ८ वाजता जिल्ह्यात शनिवारी करण्यात आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील दोन उपजिल्हा रुग्णालये आणि दोन ग्रामीण रुग्णालये इथल्या प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा मुले-गावडे यांनी दिली.
जिल्ह्यात लसीकरणासाठी १६ हजार ३३० डोस उपलब्ध झाले आहेत. पहिल्या टप्प्यात १४ हजार ९६० आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. शनिवारी यापैकी ५०० जणांना ही लस देण्यात आली आहे. कोरोनावरील लसीबाबत सामान्य माणसाला उत्सुकता आहे.
शनिवारी जिल्हा रुग्णालयासह, दापोली, कामथे ही दोन उपजिल्हा रुग्णालये, राजापूर, गुहागर ही दोन ग्रामीण रुग्णालये अशा पाच ठिकाणी या लसीचा प्रारंभ करण्यात आला आहे. या केंद्रांकडे प्रत्येकी ११० डोस देण्यात येत असून, साठवणुकीसाठी योग्य ती यंत्रणा या केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. लसीकरणासाठी लसीकरण अधिकाऱ्यांसह पाचजणांची टीम तयार आहे.
जिल्हा रुग्णालयात लसीकरण कक्ष उभारण्यात आला असून, काही दिवसांपूर्वीच लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीही झाली आहे. लसीकरणाच्या नियोजनासाठी सुरुवातीलाच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीही स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात सकाळी ८ वाजता लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला आहे.
निरीक्षणानंतर निर्णय
तयार केलेल्या यादीनुसार डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचारी अशा १०० जणांना लस देण्यात येत आहे. याची सज्जता जिल्हा रुग्णालयाने केली आहे. लस दिल्यानंतर काही दिवस काही गुंतागुंत होते का, हे पाहिले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांना कधी लस देणार, हे ठरवले जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले - गावडे यांनी दिली.