लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:02+5:302021-05-29T04:24:02+5:30
चिपळूण : तालुक्यातील खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणा-या ओमळी उपकेंद्रात बुधवारपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. सरपंच प्रदीप घडशी ...
चिपळूण : तालुक्यातील खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणा-या ओमळी उपकेंद्रात बुधवारपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. सरपंच प्रदीप घडशी यांच्या हस्ते मोहिमेला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ४५ वर्षांवरील ५० जणांना डोस देण्यात आले. साखळी पद्धतीने ही प्रक्रिया डोसच्या उपलब्धतेनुसार सुरू राहणार आहे.
नियोजनपद्धतीने लसीकरण
दापोली : तालुक्यातील उन्हवरे येथील ग्रामपंचायतीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण नियोजनपद्धतीने सुरू झाले आहे. आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया वेळेत सुरू होत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात एसटी सेवा
सावर्डे : गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात एस.टी. सेवा ठप्प झाली होती. मात्र, आता पुन्हा काही गावांमध्ये एस.टी. सेवा सुरू करण्यात आली आहे. एस.टी. फे-यांमध्येही वाढ करण्यात आल्याने काही अंशी गैरसोय दूर झाली आहे. पावसाळा कालावधीत गैरसोय दूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
रक्तदान शिबिर प्रतिसाद
आवाशी : एक सामाजिक कार्यसंस्थेच्या वतीने खेड येथील मागासवर्गीय समाजमंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला दात्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी ५० पेक्षा अधिक दात्यांनी रक्तदान केले. यावेळी प्रमाणपत्र देऊन या दात्यांचा सत्कार करण्यात आला.
मळभाचे वातावरण
देवरूख : यास चक्रीवादळाचा प्रभाव जिल्हाभर जाणवू लागला आहे. देवरूख परिसरातही गेल्या दोन दिवसांपासून मळभाचे वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
टँकरने पाणीपुरवठा
खेड : तालुक्यातील ऐनवली, बंगालवाडी येथे मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने सलग चार दिवस पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना काही अंशी दिलासा मिळाला. परंतु, आता पुन्हा पाणीटंचाईने डोके वर काढले आहे.
पाणीटंचाईचा सामना
आवाशी : खेड तालुक्यात आता पाणीटंचाई समस्या दिवसेंदिवस भेडसावू लागली आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने पाण्याचे स्राेतही आटून गेले आहे. सार्वजनिक पाणवठे कोरडे झाले असल्याने तालुक्यातील वावेतर्फे नातू, धनगरवाडी परिसरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
वादळग्रस्तांना मदत
रत्नागिरी : गेल्यावर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळातील आपद्ग्रस्तांना अजूनही मदत मिळालेली नाही. त्यानंतरच वर्षभरात आता तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्याच्या किनारपट्टीलगतच्या गावांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे या चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना तातडीने मदत जाहीर करून त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, अशी मागणी अभाविपने केली आहे.
अपघातांत वाढ
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागासह मुंबई-गोवा महामार्गावरही अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अनेक अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. खराब रस्त्यामुळे वाहनचालकांना कसरत करतच वाहने न्यावी लागतात. गेल्या काही महिन्यांपासून खड्डे आणि खणलेले रस्ते यावरून वाहने न्यावी लागत आहेत.
विनाकारण फिरणे थांबेना
रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. तरीही, काही विनाकारण फिरत आहेत. अशांची अॅंटिजन चाचणीही करण्यात येत आहे. तरीही, फिरणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नाही.