लसीकरणाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:30 AM2021-05-16T04:30:50+5:302021-05-16T04:30:50+5:30

मंडणगड : सध्या कोरोना लसीचा पुरवठा अनियमित झाला आहे. त्यामुळे राज्याकडून जेवढी लस येईल त्याप्रमाणे लसीकरण मोहीम तालुक्याच्या ठिकाणी ...

Vaccination concerns | लसीकरणाची चिंता

लसीकरणाची चिंता

Next

मंडणगड : सध्या कोरोना लसीचा पुरवठा अनियमित झाला आहे. त्यामुळे राज्याकडून जेवढी लस येईल त्याप्रमाणे लसीकरण मोहीम तालुक्याच्या ठिकाणी राबविली जाते. सध्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. मात्र अजूनही काही ज्येष्ठांना लस न मिळाल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

विजेचा लपंडाव

देवरूख : तालुक्यातील अनेक भागांमध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. माळवशी परिसरात सातत्याने वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र विजेच्या लपंडावामुळे इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणे बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा अधूनमधून खंडित होत आहे.

ग्रामीण जनतेचे हाल

लांजा : तालुक्यातील ग्रामीण भागात लॉकडाऊनमुळे दुकाने बंद आहेत. केवळ दूधविक्री आणि भाजीपाला एवढेच सुरू आहे. त्यामुळे इतर वस्तूंसाठी ग्रामीण जनतेला दुकाने सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच आता जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळू लागल्याने ग्रामीण जनतेच्या हालात भर पडणार आहे.

वादळाचा धसका

दापोली : गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाचा फटका तालुक्याला मोठ्या प्रमाणावर बसला होता. त्यातच आता पुन्हा तोक्ते चक्रीवादळाचे संकट उभे राहिले आहे. गेल्या वर्षीच्या वादळाच्या आठवणी ताज्या असतानाच आता या चक्रीवादळाच्या संकटामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली आहे.

विद्युत खांब गंजलेले

देवरुख : संगमेश्वर कळंबस्ते परिसरात विद्युत खांब गंजलेल्या स्थितीत आहेत. हे खांब कुठल्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार विद्युत मंडळाकडे मागणी केली आहे. मात्र त्याकडे अद्याप दुर्लक्ष झाले आहे. निदान आता तरी हे खांब बदलावेत, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

चोरवणे गावचा आदर्श

पाली : संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे गावचे सरपंच दिनेश कांबळे यांनी जनजागृतीचा उपक्रम गावात राबविण्यास सुरुवात केली आहे. गावात सॅनिटायझर फवारणी वेळोवेळी केली जात आहे. वाडीवार जनजागृतीपर बोर्ड लावण्यात आले आहेत. ग्रामकृती दलाचे सदस्य लसीकरणाबाबत जागृती करीत आहेत.

टॉवरची क्षमता घटली

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कर्ली येथे मोबाइल टॉवर उभारण्यात आलेला आहे. मात्र या परिसरात असलेल्या विविध कंपन्यांच्या सीम कार्डना पुरेसे नेटवर्क या मोबाइल टॉवरवरून सध्या मिळत नाही. या टॉवरखालीही रेंज येत नसल्याने इतरत्र संपर्क होताना अडचणी येत आहेत.

टँकरने पाणीपुरवठा

खेड : तालुक्यातील पोयनार बौद्धवाडी, मधलीवाडीला आतापर्यंत पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र खेड पंचायत समितीच्या सभापती मानसी जगदाळे आणि जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम यांनी तातडीने दखल घेऊन टँकर सुरू केला आहे. त्यामुळे सध्या या वाडीला पाणी मिळू लागले आहे.

पाणीटंचाईचे संकट

राजापूर : कोरोनाचा फैलाव वेगाने होत असतानाच आता तालुक्यातील दुर्गम भागातील जनतेला पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन कोदवली धरणातील पाणीसाठाही संपुष्टात आला आहे. त्यामुळे नगर परिषदेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे.

लसीकरणात अडचणी

देवरूख : ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरणाकरिताही ऑनलाइन नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटीचा अडसर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचबरोबर शासनाचे पोर्टलही काहीवेळा सुरू होण्यात अडचणी येत असतात. त्यामुळे ग्रामीण भागात लसीकरण नोंदणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Vaccination concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.