आविष्कार संस्थेमध्ये दिव्यांगांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:19+5:302021-06-26T04:22:19+5:30
रत्नागिरी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने आविष्कार मतिमंदांच्या विकासासाठी कार्यरत संस्थेमध्ये १८ ते ४४ वयोगटातील ...
रत्नागिरी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने आविष्कार मतिमंदांच्या विकासासाठी कार्यरत संस्थेमध्ये १८ ते ४४ वयोगटातील दिव्यांगांचे लसीकरण पार पडले. आविष्कार संस्था अध्यक्ष सीए बिपीन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला. रत्नागिरी परिसरातील एकूण ९७ दिव्यांग आणि ८७ पालक-कर्मचारी असे मिळून १८४ जणांचे लसीकरण आविष्कार संस्थेमध्ये पार पडले.
लसीकरण यशस्वीपणे पार पडण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या योगदानातून लसीचा पहिला डोस देण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वर्तन समस्या तसेच त्यांच्यातील भीतीचा सामना करत त्यांच्या कलेने त्यांना विश्वासात घेऊन हातखंबा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल साळवी, सुप्रिया शिंदे, मंगल ठिक, स्नेहल नागले यांनी सर्वांचे लसीकरण केले. आशादीप पालक संघटना, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, आविष्कार संस्था कर्मचारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. उपस्थित डॉक्टर आणि ए.एन.एम. टीमचे संस्था सदस्य सचिन सारोळकर यांनी आभार मानले.