राजापुरात पाच हजार लोकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:42+5:302021-04-08T04:31:42+5:30
राजापूर : तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालयांसह सात प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून कोरोनाचे लसीकरण सुरू असून, पहिल्या टप्प्यात कोवॅक्सिनचे १४३७, तर ...
राजापूर : तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालयांसह सात प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून कोरोनाचे लसीकरण सुरू असून, पहिल्या टप्प्यात कोवॅक्सिनचे १४३७, तर कोविशिल्डचे ३८७१ असे ५३०८ नागरिकांना लसीकरणचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत ९७५ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
राजापूर तालुक्यात कोरोनाचे सध्या ५२ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापूर्वी तीन वेळा हा तालुका कोरोनामुक्त झाला होता. आता पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. सुरुवातीला राजापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्राचा प्रारंभ झाला. त्यानंतर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली होती. सद्य:स्थितीत राजापूर आणि रायपाटण ग्रामीण रुग्णालयासह धारतळे, फुफेरे, कुंभवडे, जैतापूर, केळवली, सोलगाव आणि ओणी अशा सात आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू झाले आहे.
करक-कारवली आरोग्य केंद्राचे डोस रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दिले जात आहेत, तर जवळेथर आरोग्य केंद्र परिसरात नेटवर्कची समस्या असल्याने तेथे अद्याप लसीकरणाला सुरुवात झालेली नाही, अशी माहिती आरोग्य प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. तालुक्यात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड अशा दोन प्रकारचे डोस नागरिकांना दिले जात आहेत.