मोबाइल व्हॅनद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:23 AM2021-05-29T04:23:55+5:302021-05-29T04:23:55+5:30
रत्नागिरी : येथील युवा उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी आरोग्य विभागाच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांसाठी मोबाइल व्हॅनद्वारे लसीकरणाची सुविधा ...
रत्नागिरी : येथील युवा उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी आरोग्य विभागाच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांसाठी मोबाइल व्हॅनद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ या उपक्रमांतर्गत पहिल्या दिवशी शहरातील शिवाजीनगर येथे ५० लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
या उपक्रमांतर्गत पहिल्या दिवशी लसीकरण मोबाइल व्हॅन शिवाजीनगर येथे नेण्यात आली. त्याच भागात रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने सभागृह उपलब्ध केल्याने लसीकरणासाठी नाव नोंदवून आलेल्या नागरिकांना अत्यंत शिस्तबद्धपणे कोविड प्रतिबंधक कोविशिल्ड डोस घेणे शक्य झाले. ज्यांना लसीकरण केंद्रावर जाणे शक्य नाही, असे दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक यांची पूर्वनोंदणी करून घेऊन सौरभ मलुष्टे यांनी उपलब्ध केलेली व्हॅन नागरिकांपर्यंत आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांसह नेली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने सौरभ मलुष्टे राबवत असलेल्या ‘लसीकरण ऑन व्हील’ उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत केले. ही मोबाइल व्हॅन शहराप्रमाणे लगतच्या ग्रामीण भागातही नेण्याची मागणी दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
--------------------------
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथे माेबाइल व्हॅनद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले़