ग्रामीण भागात ऑफलाईन पद्धतीने लसीचे डोस द्यावेत : शेखर निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:32 AM2021-05-09T04:32:34+5:302021-05-09T04:32:34+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : १८ ते ४४ वयोगटातील लोक लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी करीत आहेत. त्यासाठी प्राथमिक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : १८ ते ४४ वयोगटातील लोक लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी करीत आहेत. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना जास्तीत जास्त वाढीव कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा करण्यात यावा. ग्रामीण भागात इंटरनेटच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने जनतेला लसीचे डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लसीकरण संदर्भात आमदार शेखर निकम यांनी आरोग्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानुसार, सध्या कोरोनाचा अटकाव करण्यासाठी शासन आदेशानुसार सर्वत्र लसीकरण केले जात आहे. मात्र, लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवली जात नाही. शहरासह ग्रामीण भागात लसीकरण केंद्रे वाढवायला हवीत. त्यापद्धतीने या केंद्रावर मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्यल्प प्रमाणात लसीचे डोस मिळतात. २०० लोकांची रांग लागलेली असताना केवळ पाच डोस उपलब्ध असतात. प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणारा डोस अत्यल्प असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही डोसचा तुटवडा जाणवतो आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याने जास्तीत जास्त लसीचा पुरवठा होणे गरजेचे आहे. लसीकरण केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने नाेंदणी करून लसीकरण प्रक्रिया केली जाते. परंतु, अनेक ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचे नेटवर्क नाही. लसीकरण केंद्रांवरती ५० टक्के नाेंदणी ऑनलाईन केलेल्या लाभार्थ्यांसाठी व ५० टक्के ऑफलाईन पद्धतीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारितील गावांसाठी राखीव ठेवून लस उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रापासून गावांचे अंतर अधिक लांब आहे. प्रत्येक कुटुंबात वाहतुकीची साधने उपलब्ध आहेतच असे नाही. एसटी वाहतूक देखील बंद आहे. त्यामुळे त्या-त्या गावात ऑफलाईन पद्धतीने लसीकरण शिबिर घेतल्यास ते ग्रामस्थांना दिलासादायक ठरणार आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात अधिक सुलभतेने लसीकरण करण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार निकम यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.