परदेशात जाणाऱ्यांसाठी प्राधान्याने लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:32+5:302021-06-04T04:24:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : नोकरी, कामानिमित्त व परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या लोकांना प्राधान्याने लस द्यावी, अशी मागणी चिपळूण ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : नोकरी, कामानिमित्त व परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या लोकांना प्राधान्याने लस द्यावी, अशी मागणी चिपळूण शहर काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत शाह यांनी केली आहे. चिपळुणातील अनेक लोकांना लस घेण्यासाठी अन्य तालुक्यात जावे लागत आहे. मात्र, चिपळुणातील आरोग्य विभागाने अद्याप याबाबत कोणतेही नियोजन केलेले नाही. याबाबत शाह यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील खाडीपट्टा भागात तसेच शहरातील अनेक लोक विदेशात नोकरीला आहेत. रमजान ईद किंवा सुट्टीवर ते आपल्या घरी आले होते. आता त्यांचा व्हिसाही तयार झाला असून, त्यांना कामानिमित्त परदेशी जायचे आहे. त्याचपद्धतीने परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता बाहेर जायचे आहे. या पार्श्वभूमीवर या लोकांच्या लसीकरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी मिश्रा यांनी परदेशी जाणाऱ्या लोकांना प्राधान्याने लस द्यावी, असा निर्णय घेतला हाेता. अशा लोकांना ऑनलाईन नोंदणी किंवा अन्य कुठल्याही प्रक्रिया पार न करता त्यांना प्राधान्याने लस द्यावी, अशी सूचना केली आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यात ही यंत्रणा राबविण्यात येत आहे.
तालुक्यात या संदर्भात नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे या लोकांची ससेहोलपट होत आहे. चिपळुणातील काहींनी खेड व अन्य तालुक्यांत जाऊन कोरोनाची लस घेतली. मात्र, त्यांना चिपळूणमध्ये लस मिळाली नाही. याची जिल्हा आरोग्य यंत्रणेने तत्काळ दखल घ्यावी व चिपळुणात परदेशी जाणाऱ्या लोकांसाठी व विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्यावी, अशी मागणी शहराध्यक्ष शाह यांनी केली आहे.