लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:44+5:302021-04-08T04:31:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात कोरोनाने कहर केलेला असतानाच लोकांना देण्यात येणारे लसीकरणही बंद करण्यात आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात कोरोनाने कहर केलेला असतानाच लोकांना देण्यात येणारे लसीकरणही बंद करण्यात आले आहे. कारण लसच उपलब्ध नसल्याने तालुक्याची आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. रुग्ण वाढल्याने रत्नागिरीतील महिला कोविड रुग्णालयातही रुग्ण ठेवण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही.
रत्नागिरी तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेसमोर आवाहन उभे राहिले आहे. तालुक्यामध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये १० लसीकरण केंद्रे असून, २ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, चरवेली आरोग्य उपकेंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय, २ नागरी आरोग्य केंद्रे, परकार हॉस्पिटल आणि रामनाथ हॉस्पिटल यांचा समावेश आहे. तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८ पदे तसेच आरोग्य सेवकांचीही ८ पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम कामकाजावर होत असल्याने आरोग्य यंत्रणा अडचणीत आली आहे. त्यावरही मात करून जास्तीतजास्त रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यावर भर देण्यात येत आहे. महिला कोविड रुग्णालय कोरोना रुग्णांनी भरल्याने ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत त्या रुग्णांना सामाजिक न्याय भवन आणि बी. एड. महाविद्यालय कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे.
रत्नागिरी तालुक्यात सुरुवातीपासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने आरोग्य विभाग अविरत कार्यरत आहे. तालुक्यात आतापर्यंत ३,२६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २,९४१ रुग्ण बरे झाले. ॲक्टिव्ह रुग्ण २३१ असून ९५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तालुक्यात आतापर्यंत १८,९१७ जणांना कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस देण्यात आली आहे. ही लस ठेवण्यासाठी आयएलआय आणि डिफ्रीजर ही पुरेसी सुविधा प्रत्येक लसीकरण केंद्रात ठेवण्यात आलेली आहे. दरम्यान, हे लसीकरण सुरू असतानाच शासनाकडून पुरेसा लसींचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर लस देण्याचे काम बंद करण्यात आले असून, आरोग्य यंत्रणा अडचणीत आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना शासनाकडून लसपुरवठा न झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
स्वत:च काळजी घ्यावी
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव, प्रसार लवकर होत आहे. त्यामुळे ज्या कोरोना रुग्णांची लक्षणे दिसून येत नाहीत त्यांनी गृह विलगीकरणात राहावे. तसेच प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी केले आहे.
रत्नागिरी तालुका आरोग्य विभागातील रिक्त पदांचा आढावा
संवर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
तालुका वैद्यकीय अधिकारी ०१ ०१ ००
वैद्यकीय अधिकारी १६ ०८ ०८
आरोग्य पर्यवेक्षक ०२ ०२ ००
आरोग्य साहाय्यक पुरुष ११ ११ ००
आरोग्य साहाय्यक महिला ०८ ०६ ०२
आरोग्य सेवक - पुरुष २० १२ ०८
आरोग्य सेवक - महिला ५३ ४९ ०४
औषध निर्माण अधिकारी ०८ ०७ ०१
सफाई कामगार ०८ ०६ ०२
स्त्री परिचर ०८ ०५ ०३
परिचर २५ १५ १०
कनिष्ठ साहाय्यक ०९ ०७ ०२