पुरवठा सुरळीत झाल्यास लसीकरण दोन महिन्यांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:34 AM2021-05-08T04:34:15+5:302021-05-08T04:34:15+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत १८ वर्षांवरील एकूण २ लाख ५२ हजार १७८ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ...
रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत १८ वर्षांवरील एकूण २ लाख ५२ हजार १७८ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सुमारे १० ला ९० हजार जणांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. लस योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्यास १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्जता ठेवली आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून आतापर्यंत आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, पहिल्या फळीतील, ४५ वर्षांवरील कोमाॅर्बिड व्यक्ती तसेच ६० वर्षांवरील व्यक्ती अशा एकूण १ लाख ६९ हजार ४३ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी पहिला डोस घेतलेले १ लाख ३४ हजार ०५९ आहेत तर ३४,९८४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. शासनाकडून येणारा लसीचा पुरवठा अनियमित झाल्याने ४५ वर्षांवरील तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण थांबले आहे. काही जणांची अजूनही ऑनलाइन नोंदणीच होत नसल्याने प्रतीक्षा करावी लागत आहे. तर सध्या येणारी लसच अपुरी असल्याने बहुतांश जणांना दुसऱ्या डोससाठी लसीकरण केंद्रावर वारंवार खेटे मारावे लागत आहेत.
२ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्याला या वयोगटातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. गेल्या सहा दिवसांत या वयोगटातील ४१ हजार १६१ जणांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात या वयोगटातील व्यक्तींची संख्या सुमारे ६ लाख ३२ हजार इतकी आहे. तर ४५ वर्षांवरील व्यक्तींची संख्या ४ लाख ५७ हजार इतकी आहे. यापैकी सध्या १ लाख ५२ हजार ८८९ व्यक्तींनी पहिली लस घेतली आहे. लसीचा वेळेवर आणि योग्य प्रमाणात पुरवठा झाल्यास जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करून प्रतिदिन अगदी १५ हजार लसीकरणाचे नियोजन केल्यास दोन महिन्यांत लसीकरण पूर्ण होऊ शकेल.
सध्या १८ ते ४४ वयोगटासाठी उपलब्ध झालेल्या लसीतून दिवसाला अगदी १२,००० डोस दिले जात आहेत. त्यामुळे असाच पुरवठा सर्वांसाठी राहिल्यास साधारणत: दोन महिन्यांत पहिला डोस पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला वाटत आहे.
युवकांचा उत्साह अधिक
सध्या १८ ते ४४ या वयोगटात लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. मात्र, यात १८ ते ३० वयोगटातील तरुणांचा लस घेण्यासाठी उत्साह अधिक दिसतो. ऑनलाइन नोंदणी करण्यातही हा वयोगट अधिक सक्रिय झाला आहे.
१२ हजारांपेक्षा अधिक डोस
शुक्रवारी १८ ते ४४ वयोग तसेच हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाइन वर्कर यांच्यासाठी पहिल्या डोसचे नियोजन केले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. बबिता कमलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच दिवशी १२ हजारांपेक्षा अधिक डोस दिले गेले.
ऑनलाइनचा असाही फटका...
पहिली लस घेताना कुणी कुठलेही केंद्र निवडू शकते. मात्र, याचा फटका जिल्ह्यातील अनेक केंद्रांना बसत आहे. शहरातील व्यक्ती कमी गर्दी असलेल्या ग्रामीण भागातील केंद्राची निवड करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला लसीकरणापासून वंचित राहावे लागत असल्याचा प्रकार शुक्रवारी उघड झाला. एवढेच नव्हे तर दुसऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींनीही काही ग्रामीण केंद्रावर जाऊन लस घेतली.
दुसरा डोस कधी मिळणार?
१५ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीला २८ दिवसांनंतर दुसरा डोस घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या होत्या. आता हा कालावधी ४५ ते ५६ दिवसांचा केला आहे. काहींनी लस घेऊन दोन महिने होत आले तरीही अजून लस न आल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
कनेक्टिव्हिटीचा अडसर
जिल्ह्यातील अनेक भागात कनेक्टिव्हिटीचा मोठा अडसर लसीकरण नोंदणीसाठी होत आहे. त्यातच ग्रामीण जनतेला कशा प्रकारे नोंदणी करावी, हेच माहीत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात सुरुवातीला लसीकरणाला कमी प्रतिसाद दिसून आला. मात्र, त्यानंतर आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने नोंदणीला सुरुवात झाली.
नोंदणी करताना यातायात
पहिल्या डोससाठी नोंदणी केल्यानंतर आपल्याला निवडलेल्या केंद्रावर जाऊन लस घेता येते. मात्र, काही वेळा शासनाचे पोर्टलच हँग होणे, ओपन न होणे, अशा समस्या येत असल्याने अजूनही काही ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या लसीचाही लाभ मिळालेला नाही. मोबाइलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया माहीत नसल्याने अशा व्यक्तींना सातत्याने केंद्रावर येऊन चाैकशी करावी लागत आहे.