राजापूरच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा वैशाली मांजरेकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 06:56 PM2022-04-08T18:56:03+5:302022-04-08T18:56:52+5:30
दोन वेळा नगराध्यक्षपद भुषविण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला होता. राजापूर नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमानही त्यांच्याच नावावर आहे.
राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा वैशाली विजय मांजरेकर यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने राहते घरी निधन झाले. त्या ५५ वर्षाच्या होत्या. मांजरेकर यांची प्रकृती गेले काही दिवस बरी नव्हती. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र आज, शुक्रवारी दुपारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यातच त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. काही महिन्यांपुर्वीच त्यांचे पती विजय मांजरेकर यांचेही निधन झाले होते.
एक शांत, संयमी आणि मितभाषी व्यक्तीमत्व म्हणून त्या परिचित होत्या. पतीच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत मांजरेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या असलेल्या मांजरेकर यांनी दहा वर्षे नगरसेवक म्हणून काम केले होते. या काळात दोन वेळा नगराध्यक्षपद भुषविण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला होता. राजापूर नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमानही त्यांच्याच नावावर आहे.
त्या पहिल्यांदा २१ जुलै २००१ ते १६ डिसेंबर २००१ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी पहिल्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. नगर परिषदेच्या स्थापनेनंतर त्या पहिल्या महिला नगराध्यक्ष ठरल्या. त्यानंतर पुन्हा त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना २३ डिसेंंबर २०११ ते ७ मार्च २०१३ या कालावधीत नगराध्यक्षपद भुषविण्याचा बहुमान मिळाला.