Ratnagiri: हातिवले टोलनाक्यानंतर पाली-खानूमधील व्हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं ऑफीसही फोडलं
By मनोज मुळ्ये | Published: August 18, 2023 11:34 AM2023-08-18T11:34:39+5:302023-08-18T11:35:07+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून मनसे आता आक्रमक झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील हातिवले टोलनाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल तोडफोड केली. त्यानंतर काल रात्री पाली-खानू (ता. रत्नागिरी) येथील व्हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं ऑफीसही फोडलं आहे.
हातिवले येथील तोडफोडप्रकरणी राजापूर पोलिसांनी मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. मनसेचे राजापूर तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर आणि उपतालुका अध्यक्ष जयेंद्र कोठारकर यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, रत्नागिरीतील पाली खानू मधील व्हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं ऑफीसही मनसेनं फोडलं. एकूणच, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेच्या मुद्द्यावर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे.
मनसेच्या पनवेलमधील निर्धार मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. दरम्यान राज ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर रत्नागिरीत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.
रत्नागिरी तालुक्यातील हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडलं. या अगोदर रायगडच्या माणगावमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. माणगावमधील चेतक सन्नी कंपनीचं कार्यालय फोडलंय. त्यामुळे आता टोलवरुन मुंबई-गोवा महामार्गात मनसेचं खळ्ळखट्याक सुरू झाले आहे.