चिपळूणनजीक फाटकात तांत्रिक बिघाड, ‘वंदे भारत’ थांबली; सुदैवाने दुसऱ्या वेळीही मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:17 IST2025-03-06T15:17:08+5:302025-03-06T15:17:24+5:30
चिपळूण : चिपळूणनजीक कळंबस्ते फाटा येथे फाटक बंद न झाल्याने गोव्याहून मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस खेर्डी रेल्वे पुलावर ...

चिपळूणनजीक फाटकात तांत्रिक बिघाड, ‘वंदे भारत’ थांबली; सुदैवाने दुसऱ्या वेळीही मोठा अनर्थ टळला
चिपळूण : चिपळूणनजीक कळंबस्ते फाटा येथे फाटक बंद न झाल्याने गोव्याहून मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस खेर्डी रेल्वे पुलावर थांबवावी लागली. अखेर पायलटिंग करत फाटकापर्यंत नेऊन मॅन्युअली पद्धतीने फाटक बंद करण्यात आले. त्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. सुदैवाने दुसऱ्या वेळीही मोठा अनर्थ टळला आहे. कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण रेल्वे स्थानकानजीक कळंबस्ते येथे रेल्वे फाटक आहे. पंधरागावाकडे जाणाऱ्या लोकांसाठी येथे उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी अनेक वर्षे करण्यात येत आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने तरतूद केली आहे. राज्य शासनानेही तरतूद करणे गरजेचे आहे. या ठिकाणी फाटक असल्याने रेल्वे आली की दहा ते वीस मिनिट फाटक बंद राहते. त्यामुळे पंधरागावकडे जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना थांबून राहावे लागते. आठ दिवसांपूर्वी याच ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे फाटक बंद न झाल्याने तारांबळ उडाली होती.
मंगळवार ४ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास याच कळंबस्ते फाटकानजीक तोच प्रकार पुन्हा घडला. वंदे भारत एक्स्प्रेस रत्नागिरीहून मुंबईकडे जात असता खेर्डी पुलानजीक आली. अचानक या एक्स्प्रेसला ब्रेक लावण्यात आले. पुलावरच गाडी थांबवण्यात आली. त्यानंतर अत्यंत हळूहळू कळंबस्ते रेल्वे फाटकापर्यंत नेण्यात आली. रेल्वे फाटक मॅन्युअरली बंद करण्यात आली आणि त्यानंतर गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली.