स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार वांदरकर गुरुजी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 01:54 PM2021-07-20T13:54:47+5:302021-07-20T13:56:34+5:30
Ratnagiri Guruji : स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार, नदीला पूर आलेला असताना पोहत पैलतीरावर जाऊन विद्यादानाचे काम करणारे तपस्वी शिक्षक, स्मशानातील मानवी कवटी उचलून विद्यार्थ्यांना धडे देणारे महादेव नारायण वांदरकर अर्थात वांदरकर गुरुजी यांचे मंगळवारी वयाच्या १०६ व्या वर्षी निधन झाले.
रत्नागिरी : स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार, नदीला पूर आलेला असताना पोहत पैलतीरावर जाऊन विद्यादानाचे काम करणारे तपस्वी शिक्षक, स्मशानातील मानवी कवटी उचलून विद्यार्थ्यांना धडे देणारे महादेव नारायण वांदरकर अर्थात वांदरकर गुरुजी यांचे मंगळवारी वयाच्या १०६ व्या वर्षी निधन झाले.
महादेव नारायण वांदरकर यांचा जन्म १५ जुलै १९१६ रोजी झाला होता. १९३५ साली ते सातवी पास झाले. ब्रिटीशांची जुलमी राजवट अनुभवलेल्या वांदरकर गुरुजी यांनी महत्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहातही सहभाग घेतला होता. आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत लांजा ते रत्नागिरी दरम्यानच्या पदयात्रेत त्यांनी सहभाग घेतला होता. १९३१ मध्ये स्वातंत्रवीर सावरकरांच्या पतितपावन मंदिर उभारणीचा संघर्षही गुरुजींनी पाहिला होता.
आपल्या मार्गदर्शनाखाली आजवर त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. याच विद्यार्थ्यांनी मिळून गुरुजींचा १०० वा वाढदिवस साजरा केला होता. वयाच्या १०५ वर्षापर्यंत नियमितपणे ते श्री राधाकृष्ण मंदिरात गीतेचा अध्याय वाचत असत. अशा तपस्वी शिक्षकाचे मंगळवारी सकाळी ८ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी ६ वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.