वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:32 AM2021-04-04T04:32:44+5:302021-04-04T04:32:44+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ओझर येथील स्मशानभूमी येथील सप्तलिंगी नदीवर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने वनराई बंधारा बांधला आहे. या वनराई ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ओझर येथील स्मशानभूमी येथील सप्तलिंगी नदीवर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने वनराई बंधारा बांधला आहे. या वनराई बंधा-यामुळे पाणी साठवण होण्यास मदत होणार आहे. ऐन टंचाईच्या काळात या पाण्याचा उपयोग होणार असल्याने ग्रामपंचायतीचे आभार मानण्यात आले.
कल्पेश जाधव यांची निवड
रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथील कल्पेश जाधव यांची इंदिरा काँग्रेस पक्षाच्या युवक तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबद्दल २३ गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र भोजे, मारुती भाटकर, रवींद्र नार्वेकर, दिलीप वायगणकर, चंद्रकांत सावंत, चंद्रकांत भुते यांनी त्यांचे अभिनंदन केले.
अनोखी रंगपंचमी
दापोली : तालुक्यातील हर्णै येथील जयभवानी प्रतिष्ठानने यावर्षी पाणी विरहीत केवळ रंग वापरून रंगपंचमी साजरी केली आहे. हे प्रतिष्ठान दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवित असते. पाणी विरहित रंगपंचमी साजरी करून या प्रतिष्ठानने वेगळा आदर्श घालून दिला आहे.
क्रिकेट रंगात
रत्नागिरी : सध्या शाळा बंद असल्याने मुले घरात असून कंटाळली आहेत. त्यामुळे सध्या अपार्टमेंटच्या खाली क्रिकेटचा खेळ रंगात येत आहे. सध्या सर्वत्र रिकाम्या जागांवर क्रिकेट रंगू लागले आहे. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बहुतांश ठिकाणी मास्क न वापरताच क्रिकेटचा खेळ सुरू असलेला दिसत आहे.
शेतकरी हवालदिल
रत्नागिरी : हवामानात सातत्याने होणारा बदल, किडीचा प्रादुर्भाव यामुळे यंदा काजूचे उत्पन्न म्हणावे तसे हाती आलेले नाही. नोव्हेंबरपासून वातावरण सतत बदलत असल्याने त्याचा परिणाम काजू आणि आंबा पिकांवर होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत.