सह्याद्रीच्या निवळी विद्यालयास राज्य शासनाचा वनश्री पुरस्कार प्रदान
By admin | Published: March 23, 2017 03:28 PM2017-03-23T15:28:17+5:302017-03-23T15:28:17+5:30
५० हजार रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविले
आॅनलाईन लोकमत
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालय निवळी या विद्यालयास यंदाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार वन दिनानिमित्त मुंबई येथे राज्यपाल सी. विद्यासागर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयात त्रिमूर्ती सभागृहात सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी अशोक विचारे व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांच्याकडे प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सामाजिक वनीकरण व वनविभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत देण्यात आला आहे . या पुरस्काराचे स्वरूप रु.५० हजार रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव मलिक, रत्नागिरी जिल्ह्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक धुमाळ, शाळेचे शिक्षक जयसिंग शिंदे, बजरंग पाटील आदीसह वन खात्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थितीत होते. विद्यालयच्या २४ एकर जागेमध्ये आंबा, काजू, कोकम आदी कोकणातील विविध फळ लागवड केलेली आहे. रोपवाटिका, औषधी वनस्पती लागवड, पालकांना मोफत वैरण वाटप, वृक्ष संवर्धन, लोकसहभागातून उभारण्यात आलेले ३ वनराई बंधारे, वणव्यांचे आपत्ती व्यवस्थापन, कृषी विद्यालयांना क्षेत्र भेटी, गांडूळ खत निर्मिती. विशेष म्हणजे हि फळ लागवड ओसाड माळरानावर फुलवलेली आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबदल संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा निकम, कार्याध्यक्ष शेखर निकम , संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन रावसाहेब सुर्वे व सर्व सदस्य यांचेकडून विद्यालयाचे अभिनंदन करण्यात आले. (वार्ताहर)