प्रकल्पाच्या पाईपलाईनसाठी खाेदलेले चर अजूनही ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:40 AM2021-04-30T04:40:47+5:302021-04-30T04:40:47+5:30
राजापूर : अर्जुना मध्यम प्रकल्पातून काढण्यात येणाऱ्या कालव्यांच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी रायपाटण परिसरातील विविध ठिकाणच्या जमिनीत खोदकाम करताना मोठमोठे ...
राजापूर : अर्जुना मध्यम प्रकल्पातून काढण्यात येणाऱ्या कालव्यांच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी रायपाटण परिसरातील विविध ठिकाणच्या जमिनीत खोदकाम करताना मोठमोठे चर खोदून ठेवण्यात आले आहेत. बरेच दिवस हे चर तसेच असून, अद्याप पाईप टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे धाेका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी त्या चरात जनावरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
अर्जुना मध्यम प्रकल्पातून दोन्ही बाजूने बंदिस्त कालव्यांची कामे गेले काही दिवस सुरू आहेत. भूमिगत पाईपलाईन टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. रायपाटण पट्ट्यात गेले अनेक दिवस खोदकाम करण्यात आले असून, त्यासाठी मोठे चर खोदण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी चर खोदून बरेच दिवस लोटले पण त्यामध्ये अद्याप पाईपच टाकण्यात न आल्याने खोदलेले चर तसेच उघडे राहिले आहेत. प्रकल्पातील कालव्याची बंदिस्त पाईपलाईनमधून आजूबाजूच्या शेतजमिनी, बागायती यांना कनेक्शन देण्यात येणार असल्याने भातशेतांमधून खोदकाम करण्यात आले आहे. त्यातील माती आजूबाजूला टाकण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीच्या कामात अडथळे आले आहेत.
पावसाळा जवळ येत असल्याने बऱ्याच ठिकाणी भाजावळीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पण शेतात खोदलेले चर व बाजूला साचलेले मातीचे ढिगारे यामुळे भाजवळीची कामे कशी करायची, अशी समस्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झाल्या आहेत शिवाय पावसाळ्यात भातशेती नांगरतानाही अनेक अडचणींचा सामनाही करावा लागणार आहे. यापूर्वीही अन्य कारणांसाठी भातशेतीतून केलेल्या खोदकामाचा त्रास शेतकऱ्यांना झाला होता अचानक जोताचे बैल रुतून बसणे, जमीन खचणे असे प्रकार घडले होते. तशाच प्रकारे संकटांना सामोरे जावे लागेल की काय याची धास्ती शेतजमीनमालकांना वाटू लागली आहे. लवकरात लवकर पाईप टाकून चर बुजवावेत, अशी मागणी आता जमीनमालकांमधून करण्यात येत आहे.