लाल मातीतही घेतली विविध पिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:29 AM2021-03-25T04:29:03+5:302021-03-25T04:29:03+5:30
मुंबई गोवा महामार्गावरील उक्षी गावचे रहिवासी मुनाफ खतीब सुरुवातीला चालक म्हणून काम करीत होते. वडिलोपार्जित भात शेती होती. भात ...
मुंबई गोवा महामार्गावरील उक्षी गावचे रहिवासी मुनाफ खतीब सुरुवातीला चालक म्हणून काम करीत होते. वडिलोपार्जित भात शेती होती. भात शेतीनंतर जमीन पुढच्या पावसाळ्यापर्यंत मोकळीच असायची. खासगी चालक असलेल्या मुनाफ यांनी बारमाही शेती करण्याचा निर्णय घेतला. नदीलगतच शेती असल्याने पाण्याची उपलब्धता झाली. लाल मातीत त्यांनी कलिंगड, हिरवी मिरची, पावटा, कुळीथ, वांगी, झेंडू तसेच वालीच्या शेंगांची लागवड केली.
सेंद्रिय शेतीकडेच अधिक कल असल्याने मुनाफ यांनी शेतीला जोड दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी दहा म्हशी व गाई राखल्या होत्या. रत्नागिरीत जाऊन ते दूध विक्री करीत असत. शेणाचा वापर शेणखतासाठी करीत असत. म्हशी व गायीबरोबर त्यांनी बकऱ्याही पाळल्या आहेत. वडिलोपार्जित काही आंबा कलमे असून, आंबा उत्पादनही ते घेत आहेत. स्वत:ची जागा कमी असल्याने आजूबाजूच्या शेतमालकांकडून मक्तेदारी पद्धतीने जागा घेऊन भाजीपाला लागवड केली आहे; मात्र आता म्हशीची संख्या थोडी कमी केली आहे.
वीस गुंठ्यात त्यांनी अगस्ता वाणाचे कलिंगड लागवड केली होती. तण येऊ नये, यासाठी मल्चिंग पद्धतीचा अवलंब केला. भाजीपाला, कलिंगड पिके घेत असताना, तुषार सिंचन योजनेचा अवलंब ते करीत आहेत. ज्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही. शिवाय कीडरोगासाठी तसेच पिकाच्या वाढीसाठी पाण्यात मिसळणारे खत पिकाला देण्यासाठी तुषार सिंचनचा वापर फायदेशीर ठरत असल्याचे त्यांचे मत आहे.
मजुरांची उपलब्धता ही प्रामुख्याने शेतकऱ्यांना भेडसावणारी समस्या आहे. त्यामुळे त्यांनी पॉवर ट्रिलर, ग्रासकटर, पॉवर स्प्रेअरसारख्या यांत्रिक अवजारांचा वापर करीत आहेत. २० गुंठ्यात त्यांना आठ टन कलिंगडाचे उत्पन्न लाभले आहे. विक्रीसाठी त्यांना फारसे कष्ट करावे लागले नाहीत. गावात तसेच रत्नागिरीत त्यांना विक्री करता आली.
पावसाळ्यात झेंडूची लागवड केली होती. भात काढताच त्यांनी झेंडू लावला. मार्गशीर्ष महिन्यात त्यांच्याकडील झेंडू तयार झाल्याने विक्री चांगली झाली. नदीकिनारी शेती असल्याने पाण्याची उपलब्धता तर झाली, शिवाय लाल मातीत पावटा, कुळीथ, वाली, हिरवी मिरची, वांगीचेही उत्पादन चांगले मिळाले. झेंडूची रोपे त्यांनी सांगलीतील नर्सरीतून आणली होती; मात्र अन्य पिकांसाठी रोपे त्यांनी स्वत:च तयार केली.
सध्या त्यांच्या शेतीत भाजीपाला तसेच मका लावला आहे. दुधत्या जनावरांसाठी मका हे खाद्य पोषक ठरत आहे. शिवाय खाण्यासाठी मक्याला चांगली मागणी होत आहे. रत्नागिरी तालुका कृषी विभागाकडून त्यांना सतत मार्गदर्शन लाभत आहे. तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडळ कृषी अधिकारी जयेश काळोखे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
..................
पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर कमी श्रमात व कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न मिळविता येते. मल्चींगसाठी खर्च एकदाच होतो; मात्र त्यामुळे तण/रान उगवणे व ते काढण्याचा त्रास वाचतो. पिकांना जादा पाणी दिले तरीही झाडे मृत होण्याचा धोका असतो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तुषार सिंंचन पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे.
मुनाफ खतीब, शेतकरी, उक्षी.