रोपवाटिकेच्या विविध पध्दतींचा होतोय अवलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:21 AM2021-06-10T04:21:43+5:302021-06-10T04:21:43+5:30
रहू पध्दतीने रोपवाटिका खरीप हंगामात अतिपावसामुळे बियाणे कुजून गेले तर अशावेळी लवकरात लवकर रोपे तयार करण्यासाठी रहू पध्दतीचा अवलंब ...
रहू पध्दतीने रोपवाटिका
खरीप हंगामात अतिपावसामुळे बियाणे कुजून गेले तर अशावेळी लवकरात लवकर रोपे तयार करण्यासाठी रहू पध्दतीचा अवलंब केला जातो. या पध्दतीत निवडलेले भात जातीचे बियाणे प्रथम एका बादलीत घ्यावे व त्यामध्ये सावकाश पाणी ओतावे. पाण्यावर तरंगणारे हलके बी काढून टाकावे. हे बियाणे स्वच्छ धुतल्यावर बियाण्यावर १० सेंटीमीटर उंचीचे पाणी ठेवून २४ तास बियाणे पाण्यामध्ये भिजत ठेवावे. या मुदतीत पाच ते सहावेळा पाणी बदलावे व नंतर पाण्यातून बियाणे काढून ते ओल्या पोत्यात सैलसर ठेवून, तोंड घट्ट बांधून उबदार व सावलीच्या ठिकाणी ठेवावे. बियाण्याला उबदारपणा आणण्यासाठी पोते भाताच्या पेंढ्यांनी सर्व बाजूंनी झाकून ठेवावे. बियाणे झाकल्याने ते उबदार राहून अंकुराची वाढ चांगली होते आणि रूजवा समप्रमाणात होतो. पोत्यात पुरेसा ओलावा राहील, याची दक्षता घ्यावी. त्यासाठी त्यावर पाणी शिंपडावे. तापमानानुसार ३६ ते ४८ तासात बियाण्याला मोड येतात. नंतर पोत्यातून बियाणे हलक्या हाताने मोकळे करून काढून घ्यावे. अशाप्रकारे ३ ते ५ मिली लांबीचे मोड आलेले बियाणे पातळ चिखल केलेल्या रोपवाटिकेच्या क्षेत्रावर सपाट वाफ्यावर पेरावे. या पध्दतीला रहू पध्दत म्हणतात.
खत, पाणी व्यवस्थापन
रहू पध्दतीने रोपवाटिका लागवडीसाठी खत, पाण्याचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने करणे आवश्यक आहे. लागवडीनंतर या वाफ्यावर एक सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवावी, म्हणजे वाफ्यावर भेगा पडणार नाहीत. रहू पध्दतीत २० ते २५ दिवसात रोपे लावणीस तयार होतात. या रोपवाटिकेतील राेपांची वाढ निरोगी व टवटवीत होते. तण उगवले तर हाताने उपटून टाकावेत. जेणेकरून रोपांची वाढ चांगल्या पध्दतीने होईल.
सुधारित तंत्रझान
रहूबरोबर चटई भात रोपवाटिका शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. एक चाै. मी.वर घेतलेल्या रोपवाटिकेतील रोपे एक गुंठा क्षेत्रासाठी पुरेशी होतात. म्हणजेच एक हेक्टर क्षेत्रासाठी १०० चाै. मी. क्षेत्र म्हणजेच एक गुंठा क्षेत्र पुरेसे आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञान वापरून रोपवाटिका तयार केली तर निरोगी व रोगप्रतिकारकशक्ती असणाऱ्या रोपांची लागवड करून पिकाची जोमदार वाढ होईल. यातून उत्पादकता वाढण्यास हातभार लागेल.