रिळ येथील मिलिंद वैद्य यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:28 AM2021-04-03T04:28:40+5:302021-04-03T04:28:40+5:30
२ एप्रिल फोल्डरला मिलिंद वैद्य नावे सेव्ह आहे मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग ...
२ एप्रिल फोल्डरला मिलिंद वैद्य नावे सेव्ह आहे
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या तालुक्यातील रिळ गावातील मिलिंद दिनकर वैद्य यांना महाराष्ट्र शासनाचा २०१८ सालचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. रासायनिक खतांचा मर्यादित वापर करतानाच सेंद्रिय पध्दतीने भातासह, भाजीपाला उत्पादन घेण्याकडे त्यांचा विशेष कल आहे. याशिवाय भरघोस उत्पन्नासह दर्जा राखण्यातही ते यशस्वी ठरले आहेत.
ते १९९० पासून शेतीच्या कामात व्यस्त आहेत. सुवर्णा वाण लावून भरघोस उत्पादन मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. प्रतिहेक्टर १९२ क्विंटल भात उत्पादन घेण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. याची शासकीयस्तरावर नोंद घेण्यात आली आहे. कठोर परिश्रम व संशोधन वृत्तीमुळेच ते नवनवीन प्रयोग करीत आहेत. कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेत असल्यामुळेच त्यांना रत्नागिरी तालुका तसेच जिल्हास्तरावर आदर्श पुरस्कार यापूर्वी प्राप्त झाला आहे.
पडिक क्षेत्र लागवडीखाली आणण्याचा त्यांचा प्रयत्न असून, बारमाही शेती ते करीत आहेत. आंबा, काजू, जाम, चिकू, नारळ, सुपारी लागवड करून बागायती फुलविली असून, अधिकाधिक उत्पादन मिळवित आहेत. याशिवाय कोथिंबीर, पालेभाज्या, भुईमूग, चवळी, कुळीथ, वाल, सूर्यफुलाची लागवड करीत आहेत. शेणखत, गांडूळखताचा वापर प्राधान्याने करीत असल्याने उत्पादन व दर्जा राखण्यात यशस्वी ठरले आहेत. गावठी भरघोस उत्पन्न देणाऱ्या पारंपरिक उत्पादनावर संशोधन करून नवीन वाण निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत.
बियाणे निर्मिती
कृषी संशोधन केंद्र, शिरगांव येथे भाताच्या वाणावर सातत्याने संशोधन सुरू असते. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी काही शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड केली जाते. संशोधन केंद्रामार्फत त्यावर देखरेख ठेवली जाते. या प्रयोगामुळे उत्पादित भात संशोधन केंद्र चांगला दर देऊन विकत घेत असल्यामुळे चांगले पैसे मिळतात. वैद्य यांच्या शेतावर नवीन वाणाचे प्रयोग संशोधन केंद्रामार्फत घेण्यात येत आहेत.
‘अमृत पायरी’वर संशोधन
बदलत्या हवामानाचा आंबा पिकावर परिणाम होत आहे. वास्तविक आपल्याकडील आंबा १९ व्या शतकातील असून, पूर्वजांनी लावलेला आहे. त्यामुळे लवकर उत्पादन देणारे, मोठ्या आकाराचे, चांगल्या दर्जाचे फळ देणाऱ्या रायवळच्या झाडावर कलमे बांधण्याचा प्रयोग सुरू आहे. याच पध्दतीने ‘अमृत पायरी’ या जम्बो पायरी नवीन जात विकसित करत असून, त्यांचा प्रयोग पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहे.
जनावरांची पैदास
शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादन देणाऱ्या जनावरांचा सांभाळ केला आहे. शेण व गोमुत्रापासून खत व जीवामृत निर्मिती ते करीत आहेत. मुरा व सहवाल जातीच्या गायींमार्फत कोकणातील वातावरणात नवीन पैदास करीत आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. कानसे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. नवीन पैदासीमुळे दूग्ध उत्पादन अधिकाधिक मिळून जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत आहे.
वडाच्या पाल्यापासून खत
वडाच्या पानात अधिक मूलद्रव्ये असल्याने मल्चिंगसाठी फायदेशीर ठरते. शिवाय बाष्पीकरण कमी होत असल्याने झाडांचे संरक्षण होते. कातळावरील झाडांच्या संरक्षणासाठी याचा फायदा अधिक होतो. शिवाय खर्चही वाचतो व बागा उन्हाळ्यातही टवटवीत राहतात. हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला असून, गेली चार ते पाच वर्षे वडाचा पाला गोळा करून खत निर्मितीबरोबर मल्चिंगसाठी वापर करीत आहेत.