Ratnagiri: वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी, चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी; नागरिक, व्यापारी धास्तावले
By संदीप बांद्रे | Published: July 25, 2023 03:29 PM2023-07-25T15:29:02+5:302023-07-25T15:32:07+5:30
भरतीमुळे आणखी काही प्रमाणात पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे
चिपळूण : मागील आठवड्यात शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सोमवारी रात्रीपासून येथे मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली असून आता बाजारपेठेतील काही भागात पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. भरतीमुळे आणखी काही प्रमाणात पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
शहर आणि ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. रात्रभर पाऊस पडत राहिला. मंगळवारी सकाळी पावसाचा जोर अधिक वाढला आणि वाशिष्ठीसह शिवनदीने देखील इशारा पातळी ओलांडली. बघता बघता बाजारपुल व नाईक कंपनी परिसरात पुराचे पाणी शिरले. याशिवाय लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय व अनंत आईस फॅक्टरी परिसरातही पाणी आले आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग व नागरिक पुराच्या भीतीने पुन्हा एकदा धास्तावले आहेत.
या संपूर्ण परिस्थितीवर प्रांताधिकारी आकाश निगाडे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे हे स्वतः जातिनिशी लक्ष देऊन आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनाही सतर्क केले आहे. परंतु सकाळी 11 वाजेपर्यंत असलेली पाणी पातळी ओहटीमुळे हळूहळू कमी होत आहे. वाशिष्ठी व शिवनदीने अद्याप धोक्याची पातळी ओलांडलेली नाही, त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी भाबरून जाण्याची गरज नाही. सायंकाळी ४ नंतर भरती असल्याने प्रशासन त्यावरही लक्ष ठेवून राहणार आहे. तसेच एनडीआरएफचे पथक सज्ज असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.