कोकणच्या शेतकऱ्यांसाठी वाशिष्ठी डेअरी वरदान ठरेल : सुभाष चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:38 AM2021-09-08T04:38:18+5:302021-09-08T04:38:18+5:30
चिपळूण : कोणताही प्रकल्प सर्वसामान्य घटकांशी जोडला गेला की नक्कीच यशस्वी होतो. अगदी त्याच पद्धतीने वाशिष्ठी डेअरी आणि मिल्क ...
चिपळूण : कोणताही प्रकल्प सर्वसामान्य घटकांशी जोडला गेला की नक्कीच यशस्वी होतो. अगदी त्याच पद्धतीने वाशिष्ठी डेअरी आणि मिल्क प्रॉडक्ट्स प्रकल्प कोकणातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन कार्यरत होईल. स्थानिक शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प खऱ्या अर्थाने वरदान ठरेल, असा विश्वास चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी येथे व्यक्त केला.
पिंपळीखुर्द येथे उभारण्यात येणाऱ्या वाशिष्ठी डेअरी आणि मिल्क प्रॉडक्ट्स प्रकल्पाचे भूमिपूजन अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रकल्प लोगो व प्रकल्प मॉडेलचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, सदानंद चव्हाण, चिपळूण नागरीच्या संचालिका स्मिता चव्हाण व संचालक, तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबाजी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, ए. बी. गुप्ते, प्रथमेश देसाई, ए. खान व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी चव्हाण बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, वाशिष्ठी डेअरी आणि मिल्क प्रॉडक्ट्स प्रकल्प उभारण्याचे प्रशांत यादव, स्वप्ना यादव आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ठरवलं, तेव्हा त्यांना या व्यवसायातील अडीअडचणी समजून घ्या, असे आधीच सांगितले आहे. कोकणात दुग्ध व्यवसायाविषयी वेगळी मानसिकता आहे. आपल्याला सहकारात काम करताना दुग्ध व्यवसायाविषयी जो अनुभव होता तो मी त्यांच्यासमोर मांडला आहे; परंतु त्यांच्यातील जिद्द व चिकाटी पाहता नक्कीच ते हा प्रकल्प यशस्वी करून दाखवतील. मात्र, संपूर्ण कोकणला उभारी देणाऱ्या या प्रकल्पात स्थानिक शेतकऱ्यांची साथ मोलाची आहे, असे सुभाष चव्हाण म्हणाले.
----------------
दर्जाबाबत तडजोड होणार नाही : प्रशांत यादव
हा प्रकल्प दोन एकर जमिनीमध्ये सुरुवातीला तीस हजार लिटर प्रतिदिन क्षमतेचा आणि नंतर पन्नास हजार लीटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दुग्ध प्रकल्प असेल. सध्याचे सर्व फार्म फ्रेश दूध या प्रकल्पाच्या माध्यमातून संकलित केले जाणार आहे. दूध व निगडित उत्पादनाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, असे वाशिष्ठी डेअरी आणि मिल्क प्रॉडक्ट्सचे संचालक प्रशांत यादव यांनी यावेळी स्पष्ट केले.