चिपळुणातील भाजीबाजार ३० पर्यंत राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:27 AM2021-04-19T04:27:55+5:302021-04-19T04:27:55+5:30
चिपळूण : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिपळुणातील भाजी व्यापारी संघटनेने रविवारपासून ३० एप्रिलपर्यंत भाजी विक्री बंद ठेवण्याचा ...
चिपळूण : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिपळुणातील भाजी व्यापारी संघटनेने रविवारपासून ३० एप्रिलपर्यंत भाजी विक्री बंद ठेवण्याचा निणय घेतला आहे. घरपोच भाजी विक्री करण्यासही या व्यापारी संघटनेने विरोध दर्शवला आहे. तूर्तास बाजारपेठेतील सर्व ठिकाणी भाजीविक्री बंद आहे.
सध्या शहर व परिसरात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. तालुक्यात एकूण ८०० हून अधिक रुग्ण कोरोनाबाधित असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. त्यातच आता कामथे उपजिल्हा रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालयामध्येही बेड अपुरे पडू लागले आहेत. या परिस्थितीमुळे येथील भाजी व्यापारी धास्तावले आहेत. अशातच जिल्हाधिकारी यांच्यामार्फत घरपोच भाजीविक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर येथील भाजी व्यापारी संघटनेची शनिवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत बाजारपेठेतील भाजीविक्री पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. तसेच घरपोच भाजी वितरीत करणे शक्य नसल्याने व कामगारांचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय ही घेण्यात आला.
बैठकीला भाजी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर शिंदे, भरत गांगण, दत्तात्रय वाळूज, मेहबूब तांबे, मारुती करंजकर, राकेश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
.................................
चिपळूण शहर व परिसरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने भाजी व्यापारी संघटनेने हा निणय घेतला आहे. घरपोच भाजी दिल्यास कामगारांना कोरोनाचा धोका वाढू शकतो. शिवाय, त्यांची वेळोवेळी कोरोना तपासणी करावी लागते. तसेच कामगारही आता उपलब्ध होत नसल्याने नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला आहे.
- भरत गांगण, भाजी व्यापारी, चिपळूण.
................................
दररोज ४० टन भाजीचा खप
चिपळुणात दिवसेंदिवस भाजी व्यापार वाढत आहे. सुमारे दीडशेहून अधिक विक्रेते असून, दररोज ४० टन पेक्षा अधिक भाजीचा खप आहे. मात्र, आता भाजी व्यापारी संघटनेने भाजी बाजार बंद करण्याचा व घरपोच सेवा न देण्याचा निर्णय घेतल्याने शहरासह परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. शिवाय, ग्रामीण भागातील किरकोळ विक्रेत्यांनाही भाजी उपलब्ध होणार नसल्याने आतापासूनच मोठी ओरड सुरू झाली आहे.
......................
पानगल्लीनेही घेतला मोकळा श्वास
पानगल्लीनेही बााजारपेठेतील पानगल्ली नेहमी भाजी विक्रेत्यांनी बहरलेली असते. मात्र, भाजी व्यापारी संघटनेने व्यापार बंदचा निर्णय घेतला असल्याने पानगल्ली रस्ता मोकळा झाला आहे. पानगल्लीच्या दोन्ही बाजूंनी नगर परिषदेने ड्रम उभारले असल्याने या रस्त्यावरून वाहतूकही बंद झाली आहे.
.......................................
चिपळूण शहरातील महर्षी भाजी मंडईचा नेहमी गजबजणारा परिसर ओस पडला आहे.
चिपळूण बाजारपेठेतील पानगल्लीचा रस्ता ड्रम उभारून बंद केला आहे.