भाजीपाल्याच्या दरात चढ-उतार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:30 AM2021-05-17T04:30:10+5:302021-05-17T04:30:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : भाजीपाला अन्य जिल्ह्यांतून येत आहे. कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. वादळामुळे कडक संचारबंदी लागू करण्यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : भाजीपाला अन्य जिल्ह्यांतून येत आहे. कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. वादळामुळे कडक संचारबंदी लागू करण्यात आल्याने भाजीपाल्याची वाहनेच न आल्याने आवक घटली आहे. भाजी, फळे विक्रेत्यांची फारशी दुकाने सुरू नव्हती. त्यातच संचारबंदीमुळे ग्राहक फारसे नसल्याने भाजीपाल्याच्या दरात चढ-उतार सुरू आहे.
कांद्याच्या दरात वाढ झाली असून १५ ते २० रुपये किलो दराने विकण्यात येणारा कांदा सध्या २५ ते ३० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. बटाट्याचे दर अद्याप स्थिर असून २२ ते २५ रुपये किलो दराने बटाटा विक्री सुरू आहे. लसणाची १०० ते १५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. पावसाळ्यासाठी लागणारा कांदा मे महिन्यात खरेदी करण्यात येत असला तरी दर वाढल्यामुळे ग्राहकांनी कांदा खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. भाज्यांचे दरही शंभराच्या पटीत असल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे. पालेभाज्यांचे दर वाढले आहेत.
वादळामुळे जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे परजिल्ह्यांतून भाजीच्या गाड्याच आल्या नव्हत्या. विक्रेते उपलब्ध भाज्या विकत होते. वादळाच्या भीतीमुळे मोजकीच भाजीची दुकाने खुली ठेवण्यात आली असली तरी ग्राहकही नव्हते. दुपारनंतर भाजीची दुकाने बंद करण्यात आली.
शेवटच्या टप्प्यातील आंबा विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहे. लाॅकडाऊनमुळे बाजारात फारसे विक्रेते नाहीत. ऑनलाईन विक्रीवर विक्रेत्यांनी भर दिला आहे. सध्या दर सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहेत.
हातगाडी घेऊन अननस विक्रेते गल्लोगल्ली फिरत आहेत. ३० ते ३५ रुपये नग दराने अननस विक्री सुरू आहे. अननसाचा हंगाम असल्याने कच्ची तसेच पिकलेले अननस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सोलून, कापून, अखंड अननसासाठी मागणी होत आहे.
गतवर्षीपासून लाॅकडाऊन व त्यातच वाढती महागाई यामुळे दैनंदिन खर्च भागत नसल्याने आगोटसाठी खरेदी कशी करावी असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे मोजक्या पैशातच जुळणी करावी लागत आहे.
- श्रावणी पवार, गृहिणी.
गेल्या दीड दोन वर्षात कडधान्य, डाळी, खाद्यतेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महागाईचा दर निश्चित करताना, सर्वसामान्यांचा विचार करावा.
- रेश्मा जमादार, गृहिणी.