चिपळुणातील भाजी व्यापार उद्यापासून होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:40 AM2021-04-30T04:40:31+5:302021-04-30T04:40:31+5:30
चिपळूण : येथील महर्षी कर्वे भाजी व्यापारी संघ १ मेपासून भाजी व्यापार सुरू करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष भरत गांगण ...
चिपळूण : येथील महर्षी कर्वे भाजी व्यापारी संघ १ मेपासून भाजी व्यापार सुरू करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष भरत गांगण यांनी दिली आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार १७ एप्रिलपासून भाजी व्यापार पूर्णपणे बंद ठेवल्याने नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याची माहिती उपाध्यक्ष भरत गांगण यांनी दिली.
शासनाने लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविण्याचे संकेत दिले असून याबाबत ३० एप्रिलला रात्री घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रशासनाचे सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून येथील सर्व भाजी व्यावसायिक सकाळी ७ ते ११ या वेळेतच आपली दुकाने सुरू ठेवणार आहेत. यापूर्वी नागरिकांनी भाजीपाला लॉकडाऊनपूर्वी घेतला होता. अशाप्रसंगी अजून पुढे १५ दिवस भाजीशिवाय राहणे अवघड झाले आहे. यामुळेच चिपळूण भाजी व्यापारी संघाने १ मे पासून भाजी व्यवसाय सुरू करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला असल्याचे गांगण यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष सुधीर शिंदे, राकेश शिंदे, मारुती करंजकर, मेहबूब तांबे, दत्तात्रय वाळुंज आदी उपस्थित होते.