गुन्हेगार संबंधांचीही पडताळणी
By admin | Published: September 2, 2014 11:30 PM2014-09-02T23:30:07+5:302014-09-02T23:30:07+5:30
डॉ. संजय शिंदे : जुन्या गाड्यांची कागदपत्रे, नंबर वापरण्याच्या प्रकरणाचा तपास चारहीबाजूने
रत्नागिरी : जुन्या गाड्या कमी दराने खरेदी करून त्या भंगारात विकायच्या व त्यांची कागदपत्र, नंबर चोरीच्या गाड्यांसाठी वापरण्याचा फंडा रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणातील गुन्हेगारांशी अन्य कोणाची हातमिळवणी आहे काय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत या गुन्हेगारीचे काही धागेदोरे पोहोचले आहेत काय, या सर्व शक्यता तपासल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नाटे-राजापूर येथील आतिक खलिक मस्तान (२६) याने खरेदी केलेल्या जुन्या गाड्या भंगारात विकल्या व त्यांचे नंबर्स व कागदपत्र चोरून आणलेल्या सुमो गाड्यांना वापरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्याकडीन ५ सुमो गाड्या व सुमो गाडीचे एक इंजिन आणि दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच त्याला अटकही करण्यात आली आहे. या प्रकारामागे राज्यस्तरीय टोळी कार्यरत असल्याचा संशय असून पोलीस सर्व शक्यतांचा विचार करून तपास करीत आहेत. अशा प्रकारे व्यवसाय करून त्यामधून मोठा फायदा मिळवण्यासाठी या टोळीचा आरटीओ कार्यालयाशीही काही संबंध आहे का? याचाही तपास करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा चारही बाजूने तपास करत असल्याचे यावेळी शिंदे यांनी बोलताना सांगितले.
भंगार गाड्या विकून त्यांचे नंबर व कागदपत्र चोरीच्या गाड्यांना वापरण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील व सहकाऱ्यांनी चांगले काम केले आहे. पुरस्काराबाबत त्याचा विचार निश्चित होईल. गाड्यांचा चोरीचा व चोरी पचविण्याचा प्रयत्न पाहता यातील गुन्हेगारांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी साटेलोटे असण्याची शक्यता वाटते काय, या प्रश्नाच्या उत्तरात डॉ. शिंदे म्हणाले की, अनेक शक्यता आहे. त्यामुळे ही शक्यताही निश्चितपणे पडताळून पाहिली जाईल. तसेच या प्रकारामागील सर्व गुन्हेगारांचा छडा लावला जाईल. (प्रतिनिधी)
उपप्रादेशिक परिवहन कार्यालये संशयाच्या भोवऱ्यात?
नाटेतील या गाडी चोरी प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा प्रकार आता उघडकीस आला आहे. मात्र असेच प्रकार राज्यात अन्यत्रही झालेले असल्याचा दाट संशय यामुळे निर्माण झाला आहे. या प्रकरणाची रत्नागिरीसह नजिकच्या जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी लिंक असण्याची शक्यता लक्षात घेता ही कार्यालये संशयाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.