दिग्गज पदाधिकारी निवडणूक रिंगणात ; मतांसाठी जोरदार रस्सीखेच

By admin | Published: April 6, 2016 10:47 PM2016-04-06T22:47:49+5:302016-04-06T23:53:33+5:30

कुडाळ नगरपंचायत निवडणूक : प्रभाग ३, ४ मधील स्थिती ; मतदारांच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक--कुडाळ गावाकडून नगराकडे

Veteran officer in election battle; Strong tactics for votes | दिग्गज पदाधिकारी निवडणूक रिंगणात ; मतांसाठी जोरदार रस्सीखेच

दिग्गज पदाधिकारी निवडणूक रिंगणात ; मतांसाठी जोरदार रस्सीखेच

Next

रजनीकांत कदम --कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. ३ लक्ष्मीवाडी येथे होणारी लढत ही तिरंगी होणार आहे तर प्रभाग क्र.४ बाजारपेठमध्ये सात उमेदवार असून यामध्ये कुडाळातील काही दिग्गज पदाधिकारी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून बाजारपेठेच्या या प्रभागात येथील प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी आपली मते टिकवून विरोधातील मते कशी मिळतील यासाठी जोरदार प्रयत्न करावा लागणार आहे.
या दरम्यान कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभाग क्र.३ लक्ष्मीवाडीचा विचार करता या प्रभागात खुला प्रवर्ग असे आरक्षण पडले असून एकूण मतदार संख्या ६४५ एवढी असून यामध्ये पुरुष ३२४ व महिला ३११ मतदार आहेत.
या प्रभागातून देवानंद काळप (शिवसेना), राकेश नेमळेकर (काँग्रेस) व सदानंद पांडुरंग अणावकर (भाजप) असे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या लक्ष्मीवाडी प्रभागात नळपाणी योजनेचा प्रश्न घराघरात पोहचविणे, उघडी गटारे, रस्ते, शौचालये, पथदीप, कचऱ्याचा प्रश्न, विहिरीचे नूतनीकरण करणे, वहाळाच्या किनारपट्टीच्या जमिनीची होणारी धूप थांबविणे असे व इतर अनेक प्रश्न येथील प्रभागात आहेत.
तसेच शिवसेनेच्यावतीने या लक्ष्मीवाडी प्रभागात देण्यात आलेला देवानंद काळप हा उमेदवार हा तेथीलच युवा नेतृत्व करणारा असल्याने हे शिवसेनेच्या दृष्टीने चांगले आहे.
तर कुडाळमधील सर्वात जास्त महत्त्वाचा व लक्षवेधक असणाऱ्या प्रभागांपैकी एक प्रभाग म्हणजे प्रभाग क्र.४ बाजारपेठ होय. लक्षवेधी म्हणण्यामागे एक कारण असे की या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार इच्छुक होते. सध्या या प्रभागात काँग्रेस, शिवसेना, भाजप यांच्यासहित ४ अपक्ष उमेदवार मिळून एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
प्रभाग क्र. ४ कुडाळ बाजारपेठ या प्रभागाचा विचार करता या प्रभागात बाजारपेठ व पानबाजार भाग अंशत: अशा वाड्या येत असून या ठिकाणी नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी पुरुष) असे आरक्षण पडले आहे. येथे एकूण मतदार संख्या ८३२ असून यामध्ये पुरुष ४२६ व महिला ४०६ मतदार आहेत.
या बाजारपेठच्या या प्रभागामध्ये काँग्रेसमधून सुनील बांदेकर, संतोष शिरसाट, (भाजप), स्नेहल पडते (शिवसेना), प्रसाद शिरसाट (अपक्ष), मधुकर पेडणेकर (अपक्ष), केदार शिरसाट (अपक्ष), आदम मुजावर (अपक्ष) असे सात उमेदवार रिंगणात आहेत. बाजारपेठ प्रभाग कुडाळ शहराचा मध्यवर्ती व महत्वाचा प्रभाग येत असून या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या कुडाळच्या बाजारपेठचा जास्तीत जास्त भाग येत आहे.
तसेच भाजी मार्केट, नगरपंचायत कार्यालय, मच्छीमार्केट हा भागही याच प्रभागात आहे. हा बाजारपेठ प्रभाग मोठा असून या प्रभागातील समस्या प्रश्नही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या ठिकाणी उघडी व काही ठिकाणी बंदावस्थेत असलेली गटारे त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून रस्त्यावर येणे, पाणपोई, रस्ते, काही सार्वजनिक विहिरीची झालेली दुरवस्था, बाजारपेठेतील विद्युत खांबावरील विद्युत तारांचे जाळे त्यामुळे वाढत असलेला धोका, विद्युत तार जमिनी खालून जाणे गरजेचे, नळपाणी योजना घरोघरी पोहचणे गरजेचे, भाजी मार्केट, मच्छीमार्केट दुरवस्था झाली असून त्यांचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे. रस्त्यावर वाढती अतिक्रमणे ही समस्या वाढत आहे. पार्किंग व्यवस्था योग्य प्रकारे नाही, वाढती वाहतूक कोंडी, घनकचरा व्यवस्थापन असे अनेक प्रश्न समस्या या प्रभागात आ वासून उभ्या आहेत.
या बाजापेठ प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रभागात उभे राहिलेल्या उमेदवारांपैकी काही या दिग्गज आहेत यामध्ये शिवसेनच्या उमेदवार स्नेहल पडते या कुडाळच्या तत्कालीन सरपंच होत्या. भाजपचे उमेदवार संतोष शिरसाट हे भाजपचे जिल्हा सरचिटणीस आहेत, काँग्रेसचे उमेदवार सुनील बांदेकर हे कुडाळ शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तर अपक्ष प्रसाद शिरसाट हे कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष आहेत. बाजारपेठ प्रभागात जास्त उमेदवार असल्याने येथे मत विभागणी मोठ्या प्रमाणात होणार असून प्रत्येक उमेदवाराला स्वत:चे मताधिक्य वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच करावी लागणार आहे हे निश्चित.


डंपिग ग्राऊंड ज्वलंत समस्या
लक्ष्मीवाडी प्रभागात भंगसाळ नदी किनाऱ्यालगतच्या जागेत ग्रामपंचायतीच्या काळात डंपिग ग्राऊंड बनविण्यात आले आहे. संपूर्ण कुडाळ शहरातील सर्व प्रकारचा घन कचरा या ठिकाणी टाकण्यात येतो. त्या कचऱ्याच्या घाणेरड्या वासामुळे व तिथे सुक्या कचऱ्याला लावण्यात आलेल्या आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे येथील लोकांना त्रास होत आहे व हे डंपिग ग्राऊंड येथून हलविण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांची असून त्यासाठी आंदोलने करण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रभागात डंपिग ग्राऊंडचा प्रश्न ज्वलंत आहे.
काँग्रेसकडून ग्रामपंचायत सदस्य
या लक्ष्मीवाडीत काँग्रेसकडून तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य राकेश नेमळेकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. ही काँग्रेससाठी जमेची बाजू आहे.
तिरंगी होणार लढत
या लक्ष्मीवाडी प्रभागामधून काहींनी अपक्ष म्हणून अर्ज भरले होते मात्र त्यांनी ते मागे घेतले. त्यामुळे आता येथे भाजप, काँग्रेस, शिवसेना असे तीन उमेदवार राहिले असल्याने येथील लढतही खऱ्या अर्थाने तिरंगी होणार हे निश्चितच आहे.

Web Title: Veteran officer in election battle; Strong tactics for votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.