ज्येष्ठ लेखिका स्मिता राजवाडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 01:20 PM2022-01-20T13:20:59+5:302022-01-20T13:21:21+5:30

हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील साहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग होता

Veteran writer Smita Rajwade passes away | ज्येष्ठ लेखिका स्मिता राजवाडे यांचे निधन

ज्येष्ठ लेखिका स्मिता राजवाडे यांचे निधन

googlenewsNext

रत्नागिरी : येथील ज्येष्ठ लेखिका स्मिता शरद राजवाडे यांचे मंगळवारी रात्री मंगळुरू येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७३ वर्षांच्या होत्या.

स्मिता राजवाडे यांचा जन्म ३० जानेवारी १९४८ रोजी झाला. त्यांचे पती शरद यांचे २००५ साली निधन झाले. स्मिता राजवाडे यांनी हिंदी आणि मराठी या दोन विषयांत प्रथम श्रेणीतून एम. ए. पदवी संपादन केली. राष्ट्रभाषा पंडित, साहित्य विशारद या परीक्षाही त्या ‘प्रथम’ श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील साहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग होता.

स्वा. सावरकर, कुसुमाग्रज, संत कबीर यांच्यावर त्यांनी विपुल लेखन केले. रामचरितमानस या संपूर्ण काव्याचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. त्या उर्दू भाषाही शिकल्या. त्यातून त्यांनी उर्दू साहित्याचा अभ्यास केला.

त्यांनी काही उर्दू काव्यरचनाही केल्या होत्या. कादंबरी, कथा, ललित, काव्यसंग्रह, अनुवादित कवितासंग्रह, बालसाहित्य, नाटक अशी त्यांची १७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. कोकण मराठी कोषामध्ये त्यांनी लेखन केले आहे. स्त्रीजीवन, संतसाहित्यावरील लेखनाचा त्यात समावेश आहे. गुण गुण गाणी या त्यांच्या बालसाहित्य संग्रहाला पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा पुरस्कार मिळाला. शीघ्रकाव्य हेही त्यांच्या साहित्यप्रतिभेचे वैशिष्ट्य होते.

रत्नागिरीत आकाशवाणीचे केंद्र सुरू झाल्यानंतर त्यांनी विविध कार्यक्रम केंद्रावर सादर केले. आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कवयित्री होत्या. त्यांना ‘ए‘ ग्रेड कलाकार म्हणून मान्यता मिळाली होती. श्रीमती राजवाडे यांनी रत्नागिरीत पटवर्धन हायस्कूल आणि फाटक प्रशालेत काही काळ अध्यापन केले. रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील जनसेवा ग्रंथालयासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले.

त्यांना स्वाती, साक्षी आणि गौरी अशा तीन विवाहित कन्या आहेत. गेली दोन वर्षे त्या मंगळुरू येथील कन्या साक्षी अभिजित शिवलकर यांच्याकडे राहायला गेल्या होत्या. तेथेच त्यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

Web Title: Veteran writer Smita Rajwade passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.