लसीकरणासाठी मर्जीतील खास, ज्येष्ठ रखडतात तासनतास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:05+5:302021-07-16T04:23:05+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू आहे. आतापर्यंत ही लसीकरण मोहीम आरोग्य विभागाच्या अखत्यारित होती. मात्र, ग्रामीण ...
रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू आहे. आतापर्यंत ही लसीकरण मोहीम आरोग्य विभागाच्या अखत्यारित होती. मात्र, ग्रामीण स्तरापर्यंत अधिकाधिक लस पोहोचावी, या उद्देशाने ग्रामपंचायत आणि नगर परिषदांनी लसीकरण मोहिमेची धुरा खांद्यावर घेतली आहे. मात्र, सध्या मर्जीतील खास व्यक्तींनाच लस प्राधान्याने पुरवली जात असून, सकाळी ६ वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर रांगा लावणाऱ्या नागरिकांना तासनतास तिष्ठत राहावे लागत असल्याने अनेक केंद्रांवर कर्मचारी आणि नागरिक यांच्यात वाद वाढले आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप होत आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले आहे. सुरूवातीला आरोग्य कर्मचारी तसेच पहिल्या फळीतील कर्मचारी यांना लसीकरण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर मार्चपासून सहव्याधी असलेल्या व्यक्ती आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरूवात झाली. दि. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जात आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच अधिकाधिक व्यक्तींना लस मिळावी, या उद्देशाने सर्व तालुक्यांमध्ये ग्रामीण आरोग्य केंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांत लस देण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाकडूनच लसीकरण मोहीम राबवली जात होती. मात्र, आता काही ग्रामपंचायतींनी मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे होणाऱ्या शिबिरात ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या मर्जीतील व्यक्तींनाच प्रकर्षाने लस दिली जात आहे. मात्र, लस मिळावी, यासाठी ऑनलाईन नोंदणी करून सकाळी अगदी ६ वाजल्यापासून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना तासनतास तिष्ठत राहावे लागत आहे. एवढे करूनही काहींना लस न मिळाल्याने तसेच घरी परतावे लागत आहे. शहरांच्या ठिकाणी आयोजित केलेल्या लसीकरणातही हेच चित्र आहे. लसीकरणात आपल्या मर्जीतील लोकांनाच पुढे करण्याच्या या प्रकारामुळे सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर राजकीय हस्तक्षेपामुळे लसीकरण केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये वाद होऊ लागल्याने या कर्मचाऱ्यांना काम करणे त्रासदायक होत आहे.
.................
रत्नागिरीतील लसीकरण केंद्रांमध्येही हाच अनुभव....
रत्नागिरीत कोकणनगर नागरी आरोग्य केंद्र, पटवर्धन प्रशाला आणि मिस्त्री हायस्कूल या तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहेत. आरोग्य विभागाचे अपुरे मनुष्यबळ लक्षात घेऊन रत्नागिरीतील हेल्पिंग हॅण्डसचे स्वयंसेवक नागरिकांना लसीकरणासाठी मदत व्हावी, या उद्देशाने कुठलाही मोबदला न घेता कित्येक महिने राबत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना योग्यप्रकारे लस मिळत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी नगर परिषदेने नियोजन आपल्याकडे घेतले आहे. सुरूवातीपासून या स्वयंसेवकांना डावलण्यात आले असून, काही मर्जीतील व्यक्तींनाच ऑनलाईन नोंदणी नसली तरी लस दिली जात आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांवरही दबाव आणला जात आहे. त्यामुळे ठराविक लोकांचे आधी लसीकरण होते. मात्र, पहाटे तीन वाजल्यापासून भरपावसात स्पॉट रजिस्ट्रेशनसाठी उभे असलेल्यांना तिष्ठत राहूनही लस मिळत नसल्याचे प्रकार घडू लागले. त्यामुळे कोकणनगर आणि पटवर्धन प्रशाला येथील केंद्रांवर नागरिक आणि आरोग्य कर्मचारी यांच्यात वाद वाढला. राजकीय हस्तक्षेपामुळे हेल्पिंग हॅण्डसच्या कार्यकर्त्यांनी काम थांबविण्याचा निर्णय घेतला. अखेर याप्रकरणी अपर जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.