वेतोशीत तीन दिवस एस. टी.ची पाठ
By admin | Published: July 23, 2014 09:48 PM2014-07-23T21:48:30+5:302014-07-23T21:54:12+5:30
महामंडळाचा मुजोरपणा : विद्यार्थ्यांची शाळेला दांडी
रत्नागिरी : गेल्या तीन - चार दिवसांपासून वेतोशी गावात एस. टी. येत नसल्याने येथील ग्रामस्थांचे हाल होत आहेत. एस. टी. आली नसल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दांडी मारावी लागली. एस. टी. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना बसला आहे.
रत्नागिरी बसस्थानकातून मजगावमार्गे दररोज सकाळी ६.३० वाजता वेतोशी गाडी सोडण्यात येते. त्यामुळे वेतोशीतून रत्नागिरीकडे येणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांना या गाडीचा फायदा होतो. मात्र, गेले तीन दिवस ही एस. टी. सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व नोकरदारवर्गाचे पुरते हाल झाले आहेत. एस. टी. न आल्यामुळे प्रवाशांकडून एस. टी. स्थानकात दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला असता, उत्तर न देता फोन उचलून चक्क बाजूल ठेवण्यात येतो. समर्पक उत्तर देण्यात येत नसल्यामुळे प्रवासीवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वेतोशीमधून शाळा, महाविद्यालयाला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४५ ते ५० इतकी आहे. शिवाय सकाळी कामावर येणारा नोकरवर्गही अधिक आहे. सकाळी एस. टी. फुल्ल भरून धावत असते. गाडी न आल्यामुळे बस मिळवण्यासाठी कोतवडेपर्यंत पाच किलोमीटर अंतर पायी तुडवावे लागते. किंवा करबुडे गाडीसाठी वेतोशी धारेपर्यंत चालत जावे लागते. त्यामुळे विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांत पोहोचू शकत नाहीत. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर वेळेत पोहोचता येत नसल्यामुळे ‘लेट मार्क’ पडत आहे.
वेतोशी ग्रामस्थांतर्फे वेळोवेळी एस. टी. प्रशासनाकडे निवेदन देऊन गाडी वेळेवर सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याला एस. टी. प्रशासन वाटाण्याच्या अक्षता दाखवत असल्याचे निदर्शनास येत आहे. (प्रतिनिधी)
-एस. टी. महामंडळाच्या गलथान कारभाराचा विद्यार्थी, ग्रामस्थांना फटका.
-ग्रामस्थांच्या मागणीला एस. टी.कडून वाटाण्याच्या अक्षता.
-प्रवाशांनी बसस्थानकात संपर्क साधला असता दूरध्वनी उचलून बाजूला ठेवण्यात येत असल्याचा आरोप.
-शाळा, महाविद्यालयातील ४५ ते ५० विद्यार्थ्यांना फटका.