Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
By मनोज मुळ्ये | Published: May 1, 2024 06:00 PM2024-05-01T18:00:48+5:302024-05-01T18:06:36+5:30
किरण सामंत यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेले उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर तसेच उदय सामंत यांचा स्वतंत्रपणे लावण्यात आलेला फोटो अचानक हटवण्यात आला आहे.
रत्नागिरी : उद्योजक आणि शिवसेना नेते किरण सामंत यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेले उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर तसेच उदय सामंत यांचा स्वतंत्रपणे लावण्यात आलेला फोटो अचानक हटवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्यामुळे किरण सामंत नाराज आहेत आणि त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत किरण सामंत यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र या कृतीतून किरण सामंत स्वतंत्र वाटचालीचे संकेत देत असल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून किरण सामंत यांनी शिंदेसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे उघडपणे मांडले. त्यानंतर उमेदवारी जाहीर होईपर्यंत मधल्या काळात किरण सामंत यांनी ठेवलेले स्टेटस खूपदा चर्चेत आले. या मतदारसंघांमध्ये भाजपला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किरण सामंत यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली आणि पक्षासाठी काम करणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी असे जाहीर केले असले तरी त्यांचे जवळचे कार्यकर्ते मात्र याबाबतची नाराजी व्यक्त करत होते.
रत्नागिरी - शिवसेना नेते किरण सामंत यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेले उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर तसेच उदय सामंत यांचा स्वतंत्रपणे लावण्यात आलेला फोटो अचानक हटवण्यात आला आहे.#UdaySamant#KiranSamantpic.twitter.com/VIOni3cEhY
— Lokmat (@lokmat) May 1, 2024
गेले काही दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीचा प्रचार सुरळीत सुरू आहे किरण सामंत आणि मंत्री उदय सामंत हे दोघेही महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत. मात्र तरीही सर्व काही आलबेल नसल्याचा मुद्दा आता पुन्हा पुढे आला आहे. मंगळवारी ३० एप्रिल रोजी किरण सामंत यांनी ठेवलेले स्टेटसही चर्चेत आले आहे. वेळेला जो उपयोगी पडतो तो आपला, असे त्यांनी स्टेटसमध्ये पोस्ट केले होते. त्यानंतर आज महाराष्ट्र दिनी दुपारी त्यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयासमोर लावण्यात आलेला एक बॅनर हटवण्यात आला. त्यावर मंत्री उदय सामंत यांचा फोटो होता. त्या पाठोपाठ कार्यालयाच्या दर्शनी काचेवर लावण्यात आलेला उदय सामंत यांचा फोटोही काढण्यात आला आहे.
किरण सामंत यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीच हे बॅनर व फोटो हटवले आहेत. लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने किरण सामंत यांच्या मनातील खदखद अजूनही दूर झालेली नाही, असा अर्थ आता राजकीय वर्तुळात लावला जात आहे, तसेच हे त्यांच्या स्वतंत्र वाटचालीचे संकेत आहेत का, असा प्रश्नही केला जात आहे.