Video - रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही - भरत जाधव
By अरुण आडिवरेकर | Published: May 21, 2023 12:34 PM2023-05-21T12:34:28+5:302023-05-21T12:36:59+5:30
रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात शनिवारी (२० मे) रात्री अभिनेता भरत जाधव यांचा नाट्यप्रयाेग हाेता.
रत्नागिरी : रत्नागिरीत नाटकाचे शाे केले त्यावेळी एसी आणि साऊंडचा प्राॅब्लेम हाेता. त्यानंतर काहीच सुधारणा झाली नाही. काहीच नीट नाही. जर चांगल्या सुविधा मिळणार नसतील तर रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही, अशी नाराजी व्यक्त करत अभिनेता भरत जाधव यांनी रत्नागिरीतील रसिकांची माफी मागितली. भरत जाधव यांच्या या नाराजीमुळे पुन्हा एकदा रत्नागिरीतील नाट्यगृहाची दुरवस्था चव्हाट्यावर आली आहे.
रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात शनिवारी (२० मे) रात्री अभिनेता भरत जाधव यांचा नाट्यप्रयाेग हाेता. नाटकाच्या प्रयाेगानंतर अभिनेता भरत जाधव यांनी नाट्यगृहातील एससी आणि साऊंड सिस्टीमवरून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. नाट्यगृहातील दुरावस्थेबाबत बाेलताना भरत जाधव यांनी नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही, असे जाहीरच करून टाकले.
रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही - भरत जाधव pic.twitter.com/liZqzqJFOH
— Lokmat (@lokmat) May 21, 2023
ते म्हणाले की, मेकअप रुम, व्यासपीठ आणि प्रेक्षक बसतात त्याठिकाणी एसी नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. ‘एससी नसल्याने काय होत हे आमच्या भूमिकेतून पाहा, अशी कळकळीची विनंती भरत यांनी प्रेक्षकांना केली. साऊंडचा तुम्हाला जसा त्रास हाेताे, तसाच ताे आम्हालाही हाेत आहे. मागे मी एक-दाेन प्रयाेग केले, त्यावेळी एसी आणि साऊंडचा प्राॅब्लेम हाेतेच. आपण याबाबत सांगितलेही हाेते. पण, काहीच झाले नाही. तुमची माफी मागताे, मात्र, यामध्ये काहीतरी बदल हाेणे आवश्यक आहे. नाहीतर चांगली चांगली नाटक आणताना खूप त्रास हाेताे, असे सांगून ‘रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही,’ असेही त्यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केले.