vidhan sabha assembly election result 2024: रत्नागिरीवर महायुतीचे वर्चस्व, उद्धवसेनेला मोठा धक्का
By मनोज मुळ्ये | Published: November 23, 2024 04:56 PM2024-11-23T16:56:09+5:302024-11-23T16:58:08+5:30
रत्नागिरी : पाचपैकी चार जागा जिंकून महायुतीने रत्नागिरी जिल्ह्यावरील आपले वर्चस्व कायम ठेवले. राजापूरचे विद्यमान आमदार राजन साळवी यांचा ...
रत्नागिरी : पाचपैकी चार जागा जिंकून महायुतीने रत्नागिरी जिल्ह्यावरील आपले वर्चस्व कायम ठेवले. राजापूरचे विद्यमान आमदार राजन साळवी यांचा पराभव झाल्याने उद्धव सेनेला मोठा धक्का बसला आहे. महायुतीचे विद्यमान आमदार उदय सामंत (शिंदे सेना), योगेश कदम (शिंदे सेना), शेखर निकम (राष्ट्रवादी अजित पवार) आणि महाविकास आघाडीचे भास्कर जाधव (उद्धव सेना) पुन्हा विजयी झाले आहेत. राजापूरमधून शिंदे सेनेचे किरण सामंत प्रथमच विधानसभेत गेले आहेत.
जिल्ह्यात सर्वात चुरशीची निवडणूक चिपळूण आणि गुहागर या दोन मतदार संघात झाली. रत्नागिरी, राजापूर आणि दापोली या मतदारसंघात एकतर्फीच निकाल लागला आहे. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) शेखर निकम यांनी प्रशांत यादव (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांचा पराभव केला. पहिल्या ९ फेऱ्यांमध्ये प्रशांत यादव यांनी ४२७१ मतांची आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर त्यांचे मताधिक्य घटत गेले आणि १३ व्या फेरीपासून शेखर निकम यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. अखेर शेखर निकम यांनी साडेसहा हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला.
गुहागर मतदारसंघातील निवडणूकही अटीतटीची झाली आणि उद्धव सेनेचे दिग्गज नेते भास्कर जाधव यांना केवळ २८३० मतांच्या फरकाने विजय मिळवला. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये त्यांनी सहा हजाराहून आघाडी घेतली हाेती. मात्र नंतर शिंदे सेनेचे उमेदवार राजेश बेंडल यांनी त्यांनी चांगली लढत दिली. त्यामुळे भास्कर जाधव यांचे मताधिक्य कमी झाले.
रत्नागिरीत शिंदे सेनेच्या उदय सामंत यांनी उद्धव सेनेच्या बाळ माने यांचा ४१,५९० मताधिक्याने पराभव केला. प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या शिंदे सेनेच्या किरण सामंत यांनी राजापूरचे उद्धव सेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांचा १९६७७ मताधिक्याने पराभव केला. दापोलीमध्ये शिंदे सेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांनी उद्धव सेनेच्या संजय कदम यांचा पराभव केला.