VidhanSabha Election 2024: चिपळूणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामन्यात मित्रपक्ष काय करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 01:20 PM2024-10-17T13:20:11+5:302024-10-17T13:22:28+5:30
सर्वच पक्षांना हवी आहे चिपळूणची उमेदवारी
रत्नागिरी : तळकोकणात राष्ट्रवादी काँग्रेसला एकमेव विजय मिळवून देणारी चिपळूणच्या जागेवर यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) अशी लढत होण्याची शक्यता आहे. पक्षाचे दोन भाग झाल्याने दोन्ही गटांना मित्रपक्षांची गरज लागणार आहे. आता महायुती आणि महाविकास आघाडीतील हे घटकपक्ष काय भूमिका घेणार, यावर चिपळूणचा निकाल ठरणार आहे.
बरीच वर्षे चिपळूण मतदारसंघावर शिवसेना भाजप युतीचे वर्चस्व होते. मात्र युतीचे वर्चस्व मोडून काढत २०१९ साली राष्ट्रवादीचे शेखर निकम येथे आमदार झाले. त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहणे पसंत केल्यामुळे आता त्यांना शिंदेसेना आणि भाजपची साथ आहे.
आधी काँग्रेसमध्ये असलेले प्रशांत यादव आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेले आहेत. तेथे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अन्य उमेदवार असले तरी लढत या पक्षात असेल.
शिंदेसेनेसह भाजपही चिपळूणसाठी आग्रही
या मतदार संघातील विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे असल्याने महायुतीकडून पुढील उमेदवार तेच असतील, हे निश्चित आहे. मात्र तरीही महायुतीतील शिंदेसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष येथे निवडणूक लढवण्याच उत्सुक आहेत. प्रत्यक्षात उमेदवारी कोणाला मिळणार आणि त्यांचे मित्रपक्ष काय करणार, यावर निकाल ठरू शकतो.
काँग्रेसलाही हवी चिपळूणची उमेदवारी
महाविकास आघाडीत उद्धवसेनेसह काँग्रेसनेही या जागेची मागणी केली आहे. तालुका काँग्रेसच्या बैठकीत या जागेसाठी अधिक आग्रह धरण्यात आला होता. तशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे जागा वाटपानंतरची काँग्रेसची भूमिकाही येथे महत्त्वाची ठरणार आहे.
उद्धवसेनेत इच्छुक अधिक
गतवेळी शेखर निकम विजयी झाले तेव्हा शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यातही ते महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यामुळे उद्धवसेनेला ही जागा लढवण्याची तीव्र इच्छा आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने. राजेंद्र महाडिक येथील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीही आधी येथे लढण्याची तयारी केली हाेती. या सर्वांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.