कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By Admin | Published: September 17, 2016 11:05 PM2016-09-17T23:05:07+5:302016-09-18T00:00:30+5:30
जिल्हाधिकारी : धरणाचे दरवाजे चार फुटांनी उघडले; ३९ हजार क्युसेक विसर्ग
सातारा : ‘हवामान खात्याने पुढील ४८ तासांत कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सध्या कोयना धरण शंभर टक्के भरले आहे. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे चार फुटांनी उघडले आहेत. धरणातून सध्या ३९ हजार ८५९ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये. तसेच पुलावरून, ओढ्यांवरून पाणी वाहत असल्यास अशा पुलांवरून वाहतूक करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत कोयना व कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, तरुण मंडळे यांना ‘एसएमएस’द्वारेही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व विभाग प्रमुखांनाही सतर्क राहण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
परतीच्या पावसाचा धडाका
जिल्ह्यामध्ये सर्वत्र परतीच्या पावसाने धडाका लावला आहे. शुक्रवारी जिल्ह्याच्या पूर्वभागात पावसाचा जोर होता. शनिवारी पश्चिम भागातही पावसाने पुनरागमन केले. खरीप ज्वारीची ठिकठिकाणी काढणी सुरू असून, खुडलेली कणसे पावसापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडताना दिसत आहे.
- संबंधित बातमी
हॅलो १ वर