पालकांची सतर्कताही महत्त्वाची : चंद्रकांत लिंगायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:30 AM2021-03-26T04:30:31+5:302021-03-26T04:30:31+5:30
राजापूर : सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी प्रत्येक पालकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध ...
राजापूर : सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी प्रत्येक पालकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध सोयी-सुविधांचा लाभ घेऊन आपल्या पाल्याची प्रगती साधावी, असे आवाहन सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस चंद्रकांत लिंगायत यांनी केले.
पाचल येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात पालक भेट कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमात प्रारंभी उपस्थित पालकांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रा. बी. ए. कश्यप यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी कल्याण मंडळ व महिला विकास कक्ष यांच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना असणाऱ्या सुविधांचा आढावा प्रा. डॉ. एस. एस. वाघमारे यांनी घेतला. महिला विकास कक्ष व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पास सवलत व रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. प्रा. डॉ. ए. डी. पाटील यांनी परीक्षा विभागासंबंधी, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख प्रा. एस. एस. धोंगडे यांनी विविध शिष्यवृत्तींसंबंधी, बी. ए. कश्यप यांनी स्पर्धा परीक्षा विभागासंबंधी, तर राजेश चव्हाण यांनी महाविद्यालयीन पातळीवर उपलब्ध सुविधांची माहिती दिली.
रायपाटणचे नूतन सरपंच महेंद्र गांगण यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांत लिंगायत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालकांमधून प्रसाद काकिर्डे यांनी महाविद्यालयातील सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. कोरोना काळात महाविद्यालयात सुरू असलेल्या उपक्रमांविषयी माहिती देणे हा या पालक भेटीचा हेतू असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस्. मेश्राम यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कश्यप यांनी केले तर प्रा. एन. जी. देवन यांनी आभार मानले.