समन्वय समितीच्या अध्यक्षपदी विजय पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:22+5:302021-06-04T04:24:22+5:30
टेंभ्ये : रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा स्तरावर कार्यरत असणाऱ्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची ...
टेंभ्ये : रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा स्तरावर कार्यरत असणाऱ्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समन्वय समितीमध्ये जिल्ह्यातील १३ संघटनांचा समावेश असून, समितीच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय पाटील यांची निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांची तर शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील व कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष प्रदीप वाघोदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारिणीमध्ये शिक्षक परिषदेचे अध्यक्ष एस. एस. पाटील यांची खजिनदारपदी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन पाटणकर व ऑफ्रोट संघटनेचे अध्यक्ष सुनील जोपळे यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. सर्व सहभागी संघटनेचे अध्यक्ष व सचिव हे समन्वय समितीचे पदसिद्ध सदस्य राहणार आहेत.
जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसमोरील सामाईक प्रश्न विविध अधिकारी स्तरावर एकत्रित मांडण्याच्या हेतूने ही समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समन्वय समितीमध्ये विविध १३ संघटनांचा समावेश आहे. समन्वय समितीच्या नुकत्याच झालेल्या ऑनलाईन सभेमध्ये सर्वानुमते कार्यकारिणी निश्चित करण्यात आली.
जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत. या सर्व समस्या सामुदायिकपणे समन्वय समितीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले. समन्वय समितीची नियमावली निश्चित केली असून, या नियमांच्या आधारेच समन्वय समिती काम करेल, असे अध्यक्ष विजय पाटील व सचिव सागर पाटील यांनी सांगितले.