जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी विक्रांत जाधव यांचे नाव आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:29 AM2021-03-21T04:29:53+5:302021-03-21T04:29:53+5:30

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी विक्रांत जाधव यांचे नाव आघाडीवर असले तरी आण्णा कदम, बाळ जाधव आणि उदय बने ...

Vikrant Jadhav's name in the forefront for Zilla Parishad presidency | जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी विक्रांत जाधव यांचे नाव आघाडीवर

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी विक्रांत जाधव यांचे नाव आघाडीवर

googlenewsNext

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी विक्रांत जाधव यांचे नाव आघाडीवर असले तरी आण्णा कदम, बाळ जाधव आणि उदय बने यांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. सोमवारी होणाऱ्या अध्यक्ष आणि सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अनेकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या ५५ पैकी ३९ सदस्य शिवसेनेचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ सदस्य आहेत; मात्र मागील विधानसभा निवडणुकीतील घडामोडींमुळे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर समर्थक ६ सदस्य आहेत. हे राष्ट्रवादीचे सदस्य शिवसेनेबरोबर आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, शिक्षण सभापती सुनील मोरे, समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव, बांधकाम व आरोग्य सभापती महेश म्हाप, महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यानंतर ही पदाधिकाऱ्यांची निवडणूक होत आहे.

आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेचे असले तरी त्यांचे समर्थक आजही जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यामध्ये त्यांचे सुपुत्र विक्रांत जाधव हे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत; मात्र आता जिल्ह्यातील राजकीय गणिते पाहता आमदार जाधव यांच्या शिवसेनेच्या पदार्पणामुळे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी खिळखिळी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला कोणी विरोधकच राहिलेला नाही. आण्णा कदम, बाळ जाधव आणि उदय बने इच्छुक असले तरी यंदा चिपळूण-गुहागर विधानसभा मतदार संघाला अध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुहागर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे यापूर्वी गुहागर तालुक्याचे सभापतीपद राष्ट्रवादीकडे होते; मात्र आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गुहागरमधील राजकीय गणिते बदलली आहेत. कारण राष्ट्रवादीचे सदस्य जास्त असले तरी तेथे शिवसेनेला सभापतीपद बहाल करण्यात आले. केवळ आमदार भास्कर जाधव यांच्यामुळेच गुहागर पंचायत समिती शिवसेनेकडे आली. त्यामुळे गुहागर पंचायत समितीतील बदलते राजकीय वारे पाहता जिल्हा परिषदेमध्ये तसा बदल होऊ शकतो. त्यामुळे इतर कोणी अध्यक्षपदासाठी इच्छुक असले तरी विक्रांत जाधव यांना अध्यक्षपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

चौकट

रत्नागिरीला कमी संधी

रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वरला यापूर्वी अध्यक्षपद शिवसेनेकडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाची संधी रत्नागिरीला मिळण्याची शक्यता कमी आहे, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरू आहे; मात्र रत्नागिरीला जिल्हा परिषदेत सभापती पद मिळणार, हे निश्चित आहे.

Web Title: Vikrant Jadhav's name in the forefront for Zilla Parishad presidency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.