पूरग्रस्तांना जीवदान देणाऱ्या विलास भोसले यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:38 AM2021-09-09T04:38:19+5:302021-09-09T04:38:19+5:30
अडरे : चिपळूण शहर व परिसरात दिनांक २२ जुलै रोजी आलेल्या प्रचंड महापुरामध्ये शहराच्या बाजूला असलेल्या पेढे गावालाही महापुराचा ...
अडरे : चिपळूण शहर व परिसरात दिनांक २२ जुलै रोजी आलेल्या प्रचंड महापुरामध्ये शहराच्या बाजूला असलेल्या पेढे गावालाही महापुराचा प्रचंड फटका बसला होता. गावात चहूबाजूंनी पाण्यात अडकलेल्या सुमारे वीस लोकांना जीवदान मिळवून देणारे पेढे गावचे सुपुत्र विलास राजाराम भोसले यांचा त्यांच्या धाडसी कामाबद्दल पेढे ग्रामपंचायतीच्यावतीने रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
महापुराच्या काळात धाडसी व महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या लोकांचा पेढे ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला पेढेचे सरपंच प्रवीण पाकळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे यांच्यासह पेढे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामसेवक, त्यांचे सहकारी, गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दिनांक २२ जुलै रोजी पेढे गावातील विठ्ठल पेठ व तळेवाडी या परिसरात सुमारे दहा फुटांपेक्षा जास्त पाणी भरले होते. त्याठिकाणी काही घरांमध्ये लोक अडकून पडले होते. चहूबाजूंनी पाणी भरत चालले असल्यामुळे घरांमध्ये अडकलेले लोक जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करत होते. मात्र, त्यांना वाचविण्यासाठी वाहत्या पाण्यातून पुढे जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. अशावेळी विलास भोसले आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसह पुढे आले आणि त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यामध्ये उडी मारुन अडकलेल्या सर्व ग्रामस्थांची दोरीच्या साह्याने पाण्यातून सुखरूप सुटका केली. सुमारे २५पेक्षा अधिक लोकांचे प्राण त्यांनी वाचवले.
विलास भोसले हे या परिसरात ‘बंधू’ नावाने परिचित आहेत. त्यांनी अतुलनीय शौर्य व धैर्य दाखवून लोकांचे प्राण वाचविल्याबद्दल त्यांचे या परिसरात विशेष कौतुक होत आहे. आमदार शेखर निकम यांनीही बंधू भोसले यांच्या धाडसाची दखल घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.